नसरापूर : कात्रज बोगद्याशेजारील शिंदेवाडी येथे वस्तीत आलेल्या घोणस जातीच्या ४ फुटी विषारी सापाने ४७ पिलांना जन्म दिला.पुणे जिल्हा वन्यप्राणी व सर्परक्षक असोसिएशनचे उपाध्यक्ष शंकर वाडकर यांनी शिंदेवाडी (ता. भोर) येथील वस्तीत आलेल्या घोणस जातीच्या विषारी सापाला पकडले. सदर साप मादी जातीचा असून उपचारासाठी ठेवला असताना या मादीने ४७ पिलांना जन्म दिला. याकरिता वाडकर व विभूते यांनी नसरापूर येथील वन परिक्षेत्र अधिकारी अनिल लांडगे व वनपाल एस. यू. जाधवर यांना माहिती दिली. त्यांनी सांगितले की, साप हा पिलांना जन्म देतो तर इतर जातीतील साप अंडी देतात. सापामधे अंडी देणारे व पिलांना जन्म देणारे असे दोन प्रकार असतात, अशी माहिती दिली. यावेळी या संस्थेचे अध्यक्ष सुशील विभूते यांनी सापाविषयी माहिती देताना सांगितले की, या सापाचे प्रजनन मे ते जून या महिन्यात होते. ६ ते ६० पिलांना जन्म देतात. यावेळी वन अधिकारी लांडगे यांच्या उपस्थितीत या सापासह पिलांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडले.