पुणे : भारतीय हवामानशास्त्र विभागाने शहरात पावसाचा रेड अलर्ट जारी केल्यामुळे सोमवारीच धरणांमधून पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, असा इशारा जलसंपदा विभागाने दिला होता. त्यानंतरही महापालिका निद्रिस्त राहिली आणि सिंहगड रस्त्यावरील एकतानगर भागातील चार हजार जणांना आपले संसार पाण्यात सोडावे लागले. इशारा देऊनही कृती न झाल्यानेच ही आपत्ती ओढावली, असा आरोप केला जात आहे. पूरनियंत्रण रेषेचा पत्ताच नसणे, इशाऱ्याकडे दुर्लक्ष करणे अशा गंभीर बाबींमध्ये महापालिका सपशेल अपयशी ठरली आहे. यात पुणेकरांचे झालेल्या अताेनात नुकसानीस महापालिका प्रशासनाला का जबाबदार धरू नये, असा प्रश्न पुणेकर उपस्थित करीत आहेत.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने सर्वप्रथम सोमवारी (दि. २२) दिलेल्या इशाऱ्यानुसार, मंगळवारी व बुधवारी पुणे परिसरातील घाटमाथ्यावर जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता होती. त्यानुसार मंगळवारपासूनच खडकवासला प्रकल्पातील चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे जलसंपदा विभागाने बुधवारी सकाळपासून खडकवासला धरणातून विसर्गाला सुरुवात केली. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने विसर्ग वाढवण्याची शक्यता असल्याचा इशाराही देण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे बुधवारी मध्यरात्री खडकवासला धरणातून सुमारे ११ हजारांहून अधिक क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. मध्यरात्री व गुरुवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे या विसर्गात मोठ्या प्रमाणावर वाढ केली. गुरुवारी सकाळी सात वाजता हा विसर्ग सुमारे ३५ हजार क्युसेक करण्यात आला.
...तरीही प्रशासन झोपले होते का?
- आगाऊ इशारा देऊनही महापालिकेने काहीही कार्यवाही केली नाही. बुधवारी रात्रीनंतर पावसाचा जोर वाढत गेला. त्यानुसार गुरुवारी पहाटे तीनपासूनच जिल्हा प्रशासनाची आपत्ती व्यवस्थापनाची यंत्रणा कामाला लागली. जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी साडेतीन वाजल्यापासूनच नियंत्रण कक्षाची जबाबदारी हाती घेतली. त्यानुसार संबंधित यंत्रणांना इशारे देऊन सज्ज राहण्यास सांगितले. यात महापालिका प्रशासनाला देखील इशारा देण्यात आला. नदीकाठच्या परिसरातील सोसायटींत पाणी शिरण्याची शक्यता असून, महापालिकेने तात्काळ त्यावर कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी महापालिकेला आदेश दिले होते. तरीही महापालिकेची यंत्रणा सकाळी प्रत्यक्ष कामाला लागली.
- परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपत्तीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी लष्कराशी चर्चा केल्यानंतर लष्कराच्या दोन तुकड्या तयार ठेवण्यात आल्या. एकतानगरीमध्ये पाणी शिरण्यास सुरू झाल्यानंतर तातडीने ‘एनडीआरएफ’ची एक तुकडी, तसेच लष्कराची एक तुकडी मदतकार्यासाठी तातडीने पाठविण्यात आली. याचवेळी महापालिकेचा अग्निशमन विभागही कामाला लागला. त्यानंतर त्यांनी नागरिकांना पूरग्रस्त भागातून काढण्यास सुरुवात झाली.
- शहरातील पाऊसमान, तसेच अन्य हवामानासंदर्भातील घडामोडींसाठी हवामान विभागाने एक स्वतंत्र व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला आहे. त्यावर पालिका प्रशासनातील सर्व महत्त्वाचे अधिकारी आहेत. विभागाने दिलेले सर्व इशारे या ग्रुपवर टाकले जातात. त्यानंतरही महापालिका अधिकाऱ्यांनी या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. यावरून मुठा नदीपात्रात पाण्याचा फुगवटा तयार झाल्यानंतरही महापालिका अधिकारी, तसेच प्रशासन झोपले होते का? असा सवाल देखील उपस्थित होत आहे.
जिल्हाधिकारी पहाटेपासूनच कामाला लागले असतील तर महापालिका प्रशासन नेमके काय करत होते? तसेच हवामान विभागाने दिलेला इशारा, जलसंपदा विभागाचा हाय अलर्ट असूनही महापालिका यंत्रणेने दोन दिवसांत हालचाल का केली नाही? - विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच
जलसंपदा विभाग म्हणते...
खडकवासला प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात गुरुवारी (दि. २५) पहाटे २ ते सकाळी ६ वाजेपर्यंत अतिवृष्टी झाली. सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत ११८ ते ४५३.५ मिमी पाऊस झाला. त्याचप्रमाणे खडकवासला धरण ते पुणे शहर या भागात १०८ ते १६७.५ मिमी इतका पाऊस झाला व तो विक्रमी स्वरूपाचा होता. त्यामुळे खडकवासला धरणातून विसर्ग सुरू करणे आवश्यक होते. त्यानुसार नियोजन करून नदीत पाणी सोडले गेले. या संदर्भात सतत संनियंत्रण करून पाणी सोडण्याची पूर्वसूचना २२ जुलैपासून पुणे महापालिका नियंत्रण कक्ष आणि जिल्हा आपत्ती निवारण कक्ष यांना देण्यात आली होती, असा दावा जलसंपदा विभागाने केला आहे.
खेळ टाेलवाटाेलवीचा
- धरणातून ३५ हजार क्युसेकने विसर्ग केल्यानंतरच एकता नगरीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली. यावर नदीपात्रातील अतिक्रमणे, बांधकामे, राडारोडा यामुळेच कमी विसर्गातूनही फुगवटा निर्माण झाल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला आहे. मात्र, केंद्रीय नागरी वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर हा विसर्ग ५५ हजार क्युसेक असल्याचा दावा केला होता. यामुळेच सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याचा आरोपही त्यांनी केला हाेता. यंत्रणांच्या समन्वयातील अभावांमुळेच ही परिस्थिती ओढवल्याचे सांगत या संदर्भात चौकशी तातडीने करण्याचे आदेश माेहाेळ यांनी दिले. मात्र, या संदर्भातील इशारा महापालिकेला दिला होता, असे स्पष्टीकरण जलसंपदा विभागाने दिले. - हवामानशास्त्र विभागाने बुधवारी व गुरुवारी घाटमाथ्यावर जोरदार ते अति जोरदार पाऊस पडेल, असा इशारा दिला होता. मात्र, बुधवारी रात्रीनंतर झालेल्या संततधार मुसळधार पावसाचा अंदाज जलसंपदा विभागालाही आला नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच विसर्ग नेमका किती होईल, याचा अंदाज घेण्यात जलसंपदा विभाग सपशेल अपयशी ठरला आहे. पाऊस वाढल्यानंतरच विसर्ग वाढला. मात्र त्यापूर्वी त्याचा अंदाज आला असता तर आपत्ती टळली असती. त्यामुळे केवळ महापालिकेला इशारा देऊन जलसंपदा विभागाने हात झटकण्याचा प्रकार केल्याचे दिसून येत आहे.
- एकता नगरीमध्ये पूर्वीच्या काळात दिलेल्या बांधकाम परवानगीमुळेच नदीपात्रांमध्ये मोठ्या प्रमाणात इमारती बांधण्यात आल्या. मात्र, या इमारतींमध्ये पाणी शिरण्याचा धोका असताना महापालिकेने या संदर्भात कोणतीही उपाययोजना केलेली नाही. महापालिकेने अद्यापही या वसाहतींना स्थलांतरित करण्याचा कोणताही आराखडा तयार केलेला नाही. त्यामुळेच ही परिस्थिती वारंवार उद्भवत आहे, असे विवेक वेलणकर यांचे म्हणणे आहे.
- महापालिका तसेच जलसंपदा विभागात कोणताही समन्वय नव्हता. महापालिकेची २४ तास सुरू असणारी हेल्पलाइन कार्यरत नव्हती. जलसंपदा विभागाने दिलेले इशारे वरिष्ठांपर्यंत वेळेत पोचले नाहीत. पुढील दोन महिन्यांत पाऊस वाढण्याची शक्यता यापूर्वीच भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेली आहे. त्यामुळे केवळ ३५ हजार क्युसेकने पाणी सोडल्यानंतर ही परिस्थिती उद्भवली असेल तर भविष्यात एक लाख क्युसेकने पाणी सोडल्यास काय होऊ शकते, याची कल्पना न केलेली बरी. त्यामुळेच दोन्ही यंत्रणांमध्ये समन्वय अतिशय गरजेचा आहे.
- केंद्रीय नागरी वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी हा विसर्ग ५५ हजार क्युसेक असल्याचा दावा केला होता. मात्र, या संदर्भात त्यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही. त्यांनी या घटनेच्या खोलात जाऊन नेमकी चूक कोणाची हे शोधून काढणे गरजेचे आहे. त्यानुसार त्यांनी कारवाई करावी. तसेच सर्व संबंधित यंत्रणांना कार्यवाही करण्याचेही आदेश द्यावेत.