पुणे : केसनंद फाटा येथील बसस्टॉपजवळ रेमडेसिविर इंजेक्शनची विक्री करण्यासाठी आलेल्यांना अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली.
लक्ष्मीकांत विष्णू ढेंगळे (वय २१, रा. केअर हॉस्पिटल, लॅब टेक्निशियन, वाघोली), योगेश सेवालाल राठोड (वय २२, रा. लोंढे वस्ती, थेरगाव, पिंपरी), नानासाहेब वसंत साळवे (वय ३२, रा. साईविहार सोसायटी, केसनंद), शुभम सुदाम मुखेकर (वय २३, रा. वाघोली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
दोन तरुण रेमडेसिविर इंजेक्शन विकायच्या तयारी असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस नाईक साहिल शेख यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठविला. त्याच्याकडे इंजेक्शन देत असताना पोलिसांनी छापा घालून ढेंगळे व राठोड यांना पकडले. त्यांच्याकडून एक इंजेक्शन जप्त केले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर नानासाहेब साळवे व शुभम मुखेकर यांच्याकडून ते इंजेक्शन मिळाल्याचे समजल्यावर पोलिसांनी या दोघांनाही अटक केली. पोलीस उपनिरीक्षक अमोल गवळी, अमंलदार प्रशांत बोमोदंडी, साहिल शेख, महेश साळुंखे, नितीन जगदाळे यांनी ही कारवाई केली.