पुणे : बांधकाम क्षेत्रातील सिटी कॉपोरेशन या कंपनीला तेथील एका कर्मचाऱ्यानेच बनावट कागदपत्राद्वारे ४० ते ४५ लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे.
आशिष शेळके (रा. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी सुनिल सुरेश तरटे (वय ५४, रा. बिबवेवाडी) यांनी हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
आशिष शेळके हा हडपसर येथील अमनोरामध्ये असलेल्या सिटी कॉपोरेशन लि. या कंपनीत कामाला होता. २०११ ते २०२० या कालावधीत विविध बँकांकडून कंपनीला मिळणारी कमिशनची रक्कम ही कंपनीची असताना त्याने ती कंपनीकडे जमा न करता हेतूपूर्वक मॅनेजर अतुल गोगावले यांची खोटी सही करुन बनावट कागदपत्रे तयार केली. त्याद्वारे बँकेत खाते उघडून कमिशन कोड तयार केले. तेथून कमिशनची रक्कम स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी स्वत:कडे बाळगून स्वत:साठी वापर केला. कंपनीचा विश्वासघात करुन कंपनीची अंदाजे ४० ते ४५ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील अधिक तपास करीत आहेत़