नम्रता फडणीसपुणे : निसर्गरम्य परिसरात एखादी जागा घ्यायची आणि त्यावर छान फार्महाऊस विकसित करून कुटुंबासमवेत सुट्टीच्या दिवसात त्याचा आस्वाद घेण्यास जायचं..अशी एक सर्वसाधारण सुखी आयुष्य जगण्याची कल्पना असते. पण निसर्गाची लहानपणापासूनच आवड असलेल्या एका तरूणाने स्वत:चा विचार न करता पर्यावरणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने विधायक पाऊल उचलले आणि चिपळूणमधील (जि. रत्नागिरी) शिरवली गावातल्या स्वत:च्या 40 एकर जमिनीवर चक्क जंगल संरक्षित केले . हे ऐकून काहीसे आश्चर्य वाटले ना! एकीकडे विकासाच्या नावाखाली जंगले नष्ट केली जात असताना स्वत:च्या खासगी जमिनीवर जंगल विकसित करण्याचा अभिनव प्रयोग करणे हे नक्कीच समाजासमोर आदर्शवत उदाहरण ठरले आहे. या हिरव्यागार बहरलेल्या सृष्टीमध्ये दुर्मिळ पक्षी, प्राणी, सर्प, झाडे अशी विपुल वनसंपदा पाहायला मिळते हे त्यातील विशेष!
ही गोष्ट आहे, निसर्गप्रेमी निशिकांत उर्फ नंदू तांबे या तरूणाची. स्वत:चे एक सुंदर घरं असावे असे प्रत्येकाला वाटते. मग पक्षी आणि प्राण्यांचं सुंदर घर का असू नये? असे त्यांना वाटले आणि पक्षी, प्राणीयांच्यासाठी त्याने हक्काचे एक घर विकसित केले. बारा एकरपासून सुरूझालेल्या त्यांच्या जंगलाचा प्रवास आज 40 एकरपर्यंत येऊन पोहोचला आहे.भविष्यात 100 एकरपर्यंतचे उद्दिष्ट्य त्यांना गाठायचे आहे आणि तोच एकध्यास त्यांनी घेतला आहे. आज कोकणाच्या अनेक भागांना ह्णनिसर्गह्णचक्रीवादळाचा फटका बसला. परंतु ह्यनिसर्गाह्णने बहरलेल्या या जागेला‘निसर्ग’चा धक्काही लागलेला नाही. या जंगलाची विस्तृत कहाणी नंदू तांबे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना उलगडली. माणसासाठी काम करणाऱ्या अनेक व्यक्ती किंवा किंवा संस्था आहेत. परंतु, प्राणी-पक्षांसाठी काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्ती खूप कमी आहेत याकडे त्यांनी लक्ष वेधले.
निशिकांत तांबे म्हणाले, निसर्गाची लहानपणापासूनचं आवड आहे. पण त्या आवडीचे अशा कामात रूपांतर होईल असे कधी वाटले नाही. नोकरी करण्याची इच्छा कधी झाली नाही.उलट ज्या गोष्टीत रस आहे त्यातंच स्वत:ला झोकून द्यावेसे वाटले. आयुष्य सगळं जंगलातच गेले असल्याने त्यानेचं मला सहजरित्या जगायला शिकवलं. इथं कोणत्याही गोष्टी व्यावसायिकदृष्ट्या विकसित केलेल्या नाहीत. फक्त जैवविविधतेचा प्रामुख्याने विचार केला. पक्षी, प्राण्यांना काय हवयं तरते हक्काचे घरं. जिथं सगळे जण एकत्रितपणे राहू शकतील. मग त्यांचे घरकोणते असेल तर ते 'जंगल'. तेचं चांगल्या पद्धतीने विकसित करण्यावर भर दिला. एक उत्तमप्रकारे नैसर्गिकरित्या वाढत असलेले जंगल करायचे.वृक्षारोपणापेक्षाही आहे त्या झाडांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला.
आजमितीला या जंगलामध्ये 120 प्रकारची झाडे आणि 232 पेक्षा अधिक पक्षी आढळतात. भारतात जे काही दुर्मीळ पक्षी आढळतात त्यापैकी 19 टक्के पक्षी या जंगलात पाहायला मिळतात. या जंगलाचे आकर्षण म्हणजे तिबेटी खंड्या आहे.याशिवाय 40 विविध प्रकारचे साप आहेत. इतक्या मोठ्या जंगलाचे संवर्धन करायला पैसे हे लागतातचं. उलट कमीच पडतात. मग याकरिता मित्रांनी सुचविल्याप्रमाणे या ठिकाणी जे छायाचित्रकार काही दिवसांसाठी पक्षी निरीक्षणासाठी येतात. त्यांच्याकडून मिळणाऱ्या रकमेचा वापर जंगल संवर्धनासाठी करतो. मात्र यात कोणताही व्यावसायिक दृष्टीकोन नाही तर जंगलसंवर्धनात सर्वांचाच हातभार लागावा इतकाच शुद्ध हेतू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.------------------------------------------------------------------------