पुणे : पुणे रेल्वे विभागाच्या वाणिज्य आणि परिचालन विभागाने व्यवसाय विकास युनिट अंतर्गत विविध मालाची वाहतूक करत ४० कोटी ५४ लाखांचा महसूल मिळवला आहे. या विभागाकडून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध प्रकारच्या वस्तूंची नियमितपणे वाहतूक केली जाते. यात ऑटोमोबाईल्स, साखर, पेट्रोलियम या उत्पादनांचा समावेश आहे. जुलै महिन्यात १४५ मालगाड्यांची वाहतूक करून हा महसूल मिळवला.
जुलै महिन्यात चिंचवड, खडकी आणि लोणी स्थानकांवरून ४४ मालगाड्यांमधून १ हजार १२४ वॅगनमधून ऑटोमोबाईल उत्पादनांची वाहतूक करून ७ कोटी ६ लाख रुपयांचा महसूल मिळवला. तसेच गुर मार्केट कोल्हापूर, सांगली, मिरज, कराड, सातारा आणि बारामती या मंडळाच्या स्थानकांवरून साखरेची वाहतूक केली जाते. या अंतर्गत ८२ हजार टनांहून अधिक साखर ३१ मालगाड्यांमधून १ हजार ३०१ वॅगनद्वारे रवाना करण्यात आली. यातून २० कोटी रुपयांचा महसूल मिळाला. याशिवाय लोणी स्थानकातून १ लाख १४ हजार टन पेट्रोलियम पदार्थांच्या ४४ मालगाड्या विविध ठिकाणी पाठवण्यात आल्या. त्यातून १२ कोटी ६० लाख रुपयांचा महसूल मिळाल्याचे पुणे रेल्वे विभागातर्फे सांगण्यात आले.