पुणे : येथील जम्बो कोविड सेंटरमधील आयसीयू विभागातील डॉक्टरांनीच केलेल्या आरोपांची आॅडिओ क्लिप, पत्रकार पांडुरंग रायकर यांचा मृत्यू, सुविधांअभावी रूग्णांचे होणारे हाल आदींमुळे हे हॉस्पिटल वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. जम्बो हॉस्पिटलचे काम पाहणाºया लाईफ लाईन या एजन्सीच्या तब्बल चाळीस डॉक्टरांनी तडकाफडकी राजीनामे दिले आहेत.
कोविड-१९ च्या रूग्णांना मोफत उपचार करण्यासाठी आणि ८०० बेडची क्षमता असल्याचे सांगून जम्बो हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले. परंतु, येथे फक्त नावातच जम्बो असून, कामात मात्र शून्य असल्याचे दिसून येत आहे. सुविधांच्या अभावी हे हॉस्पिटलच सध्या व्हेंटिलेटरवर आहे, परिणामी येथील सुविधा सक्षम होईपर्यंत नवीन रूग्णांना दोन दिवस तरी प्रवेश मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
मोठा गाजावाजा करून उभारलेल्या या हॉस्पिटलचा फोलपणा उघड झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हे काम संबंधित एजन्सीला जमत नसेल तर नवीन एजन्सी नियुक्त करा, असे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलवर नियंत्रण असलेल्या पुणे महापालिकेने तात्काळ ४५ डॉक्टरांची येथे नियुक्ती केली आहे.
जम्बो हॉस्पिटल चालविणाºया लाईफ लाईन एजन्सीकडील काही डॉक्टरांनी राजीनामे दिले आहेत. परंतु त्यांचा महापालिकेशी काही संबंध नाही. महापालिकेने येथील यंत्रणा सक्षम करण्यासाठी स्वत: ४५ डॉक्टरांची व १२० पॅरामेडिकल स्टाफची नियुक्ती केली आहे. पुढील दोन दिवस ही यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येणार असून, तोपर्यंत येथे नवीन रूग्णांना दाखल करून घेण्यात येणार नाही.- राजेंद्र मुठे, उपायुक्त, पुणे महापालिका