पुणे: कंपनीचा मालक बोलत असल्याचे भासवत संबंधित कंपनीमध्ये काम करणाऱ्याला ऑनलाईन पद्धतीने पैसे पाठवण्यास भाग पाडल्याचा प्रकार समोर आला आहे. कंपनीच्या खात्यातून एकूण ४० लाख ६० हजार रुपये पाठवण्यात आल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबत आशिष राजीव बोडस (वय- ३९, रा. प्रभात रस्ता) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार २१ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास घडला आहे. अनोळखी आरोपींनी संगनमत करून एका कंपनीच्या कार्यालयात काम करणाऱ्या आशिष बोडस यांना व्हाट्सअप कॉल केला. "मी महत्वाच्या मीटिंगमध्ये आहे. कृपया व्हाट्सअँप मेसेज तपासा आणि सांगितल्याप्रमाणे करा." असे सांगून फोन कट केला. व्हाट्सअप पाहिले असता खालील बँक खात्यावर सांगितल्याप्रमाणे ४०,६०, ९०९ रुपये ट्रान्स्फर करा असे म्हटले होते. फिर्यादींनी त्या क्रमांकावर पुन्हा फोन केला असता सायबर चोरट्यांनी फोन कट करून, "मीटिंगमध्ये असल्या कारणाने फोनवर बोलणे शक्य नाही." असा मेसेज केला. फिर्यादींना विश्वास पटल्याने त्यांनी पैसे ट्रान्स्फर केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादींनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. या प्रकणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे या करत आहेत.