पुणे : दुबईवरून पुण्याला आलेल्या विमानातील कचऱ्याच्या डब्यात तब्बल ४० लाखांचे सोने आढळून आले असून, कस्टम्सच्या अधिकाऱ्यांकडून पकडले जाण्याच्या भीतीने हे सोने कचऱ्यात टाकणाऱ्या महिलेला कस्टम विभागाने अटक केली आहे. ही घटना शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास लोहगाव विमानतळावर घडली.शकुंतला नरेश जैन असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. शकुंतला ही दुबईहून एअर इंडियाच्या विमानाने शनिवारी दुपारी पुण्याला आली. कर्मचाऱ्यांना विमानाच्या स्वच्छतागृहात कचऱ्याच्या डब्यात सोन्याची १२ बिस्किटे आढळून आली. ही बाब तातडीने विमानातील अधिकाऱ्यांना सांगण्यात आली. शकुंतला ही स्वच्छतागृहात गेल्याची माहिती मिळाल्यावर तिचा आसन क्रमांक तपासण्यात आला. ती १५ एफ क्रमांकाच्या आसनावरून प्रवास करीत होती. तिचा शोध घेत असताना शकुंतला ही ग्रीन चॅनेलमधून जात असल्याचे दिसले. कस्टमच्या अधिकाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. तिला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. शकुंतला ही ‘कुरिअर’ म्हणून काम करीत असून, दुबईहून सोबत आणलेले हे सोने तिने पकडले जाण्याच्या भीतीने कचऱ्याच्या डब्यात टाकल्याची कबुली दिली. या सोन्याची किंमत ४० लाख १३ हजार ५७० रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तिला प्रोव्हिजन आॅफ कस्टम्स कायदा १९६२ नुसार अटक करण्यात आली आहे.(प्रतिनिधी)
विमानतळावर जप्त ४० लाखांचे सोने
By admin | Published: July 29, 2014 3:23 AM