कोरेगाव भीमा : कोरेगाव भीमा, सणसवाडी येथील जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी पोलिसांनी बुधवारी ४० जणांना अटक केली. या प्रकरणी १९ गुन्ह्यातील ९० आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. त्यांना शिरूर न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. अटक केलेल्यांमध्ये स्थानिकांसह गावाबाहेरीलही आरोपी आहेत. दरम्यान, महसूल विभागाने या प्रकरणी पंचनामे पूर्ण केले आहे. या घटनेत ११६ चारचाकी, ९५ दुचाकी जळून खाक झाल्या असून तब्बल साडे दहा कोटी रुपयांच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत.१ जानेवारीला कोरेगाव भीमा येथे सुरु झालेली दगडफेक आणि जाळपोळ झाली होती. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात येथे दंगल, जाळपोळ, मारहाण, दगडफेक असे १९ गुन्हे दाखल केले आहे. या गुन्ह्यामधील सहभागींना शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी कोरेगाव भीमा-सणसवाडी येथे समन्वय समिती स्थापन करण्यात आली होती. बुधवारी कोरेगाव भीमा येथील ८ व सणसवाडीतील ३२ जणांना अटक करण्यात आली. सर्व गुन्ह्यामध्ये स्थानिकांसह बाहेरील नागरिकांचा देखील समावेश असून त्यांची देखील माहिती प्राप्त करण्यात आली आहे. त्यांना देखील लवकरच अटक करणार असल्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी सांगितले. खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, दंगा करणे, जाळपोळ करणे, दगडफेक करणे यासह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी वेगवेगळ्या १९ गुन्ह्यात आतापर्यंत ९० जणांना अटक करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील अनेक आरोपी फरार झाले आहेत. त्यातील काही जणांना पोलीस पथकाने शोधून काढुन अटक केली आहे. यामध्ये काही राजकीय व्यक्तींचा देखील समावेश आहे. या दंगलीचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे पोलीस निरिक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरिक्षक अतुल भोसले, पोलीस उपनिरिाक्षक गणेश वारुळे करित आहेत.सणसवाडी येथील समन्वय समितीने शिक्रापूर पोलिसांना तपासात सहकार्य करुन जे दोषी असेल त्यांना स्वत: हुन हजर करु असे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे बुधवारी ३२ जणांना समन्वय समितीने शिक्रापूर पोलीसांकडे स्वत: हजर केले.
पोलीस ३४ दिवस आॅन ड्युटीवढु बुद्रुक येथील तणाव व नंतर १ जानेवारी कोरेगाव भीमा-सणसवाडी दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोरेगाव भीमा, सणसवाडी वढु बुद्रुक येथील संभाजी महाराज समाधी व गोविंद गोपाळ यांची समाधी व पेरणे येथील ऐतिहासिक विजय स्तंभ याठिकाणी अद्यापही मोठा पोलीस फौजफाटा कायम आहे. या गावांना पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. २९ डिसेंबर रोजी सुरु झालेला पोलीस बंदोबस्त ३१ जानेवारी रोजीही कायम असल्याने आहे.
दंगलीत असणाऱ्या सर्वांवर कारवाईकोरेगाव भीमा-सणसवाडी दंगलीमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या स्थानिक अथवा बाहेरील सर्वच आरोपींवर कारवाई होणार आहे. नागरिकांनीही तपासामध्ये सहकार्य करण्याचे आवाहन शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांनी केले आहे.