ओतूर: जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार गावच्या हद्दीत डेरेमळा येथे बुधवारी सकाळच्या सुमारास एका बिबट्याने हल्ला करुन ४० वर्षीय महिलेला ठार केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरु केला आहे. बिबट्याच्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आजूबाजूच्या परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
पिंपरी पेंढार येथील डेरेमळा येथे सुजाता रवींद्र डेरे (वय ४०) ही महिला सकाळी सहा वाजता लघुशंकेसाठी घराबाहेर पडली होती. मात्र त्याचवेळी दबा धरुन बसलेल्या बिबट्याने सुजाता डेरे यांच्यावर झडप घालून त्यांच्यावर जोरदार हल्ला केला. बिबट्याने सुजाता डेरे यांना मोठ्या प्रमाणात जखमी करून घरापासून १०० फूट ओढत नेऊन ठार केले.
या घटनेमुळे पिंपरी पेंढार आणि आजूबाजूच्या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सुजाता डेरे यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. बिबट्यामुळे नाहक बळी जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. घराबाहेर पडायचे की नाही असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे.
दिवसेंदिवस जुन्नर तालुका हा बिबट्यामुळे भीतीच्या छायेत आहे. बिबट्या जुन्नर तालुक्यात नको असतील त्यांची नसबंदी करा अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. या घटनेनंतर उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण जुन्नर वनविभागाच्या पथकाने पिंपरी पेंढार येथे धाव घेत पिंजरे लावले आहेत. तसेच हल्ला करणाऱ्या बिबट्याचा रेस्क्यू टीम शोध घेत आहे. ओतूर पोलीस देखील घटनास्थळी पोहोचले आहेत.