बारामती : बारामती शहरासाठी जवळपास ४०० अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे प्रस्तावित आहे. 'फेस डिटेक्शन' ची सुविधा या नवीन प्रणाली मध्ये आहे .या प्रणालीमुळे गुन्हेगारांवर पाळत ठेवणे शक्य होणार असल्याचे अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते यांनी उद्योजकांशी बोलताना सांगितले.
आधुनिक तंत्रज्ञानाची सीसीटीव्ही कॅमेरे एमआयडीसी मध्ये बसवल्यास गुन्हेगारांवर पाळत ठेवून जेरबंद करणे शक्य होणार आहे, उद्योगांनी यासाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते यांनी यावेळी व्यक्त केली.
बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन चे अध्यक्ष धनंजय जामदार सचिव अनंत अवचट खजिनदार राधेश्याम सोनार सदस्य शेख वकील, महादेव गायकवाड, हरिभाऊ थोपटे, संभाजी माने, हरीश कुंभारकर, नितीन जामदार, परवेज सय्यद,सुनील वैद्य आदी पदाधिकारी व ऊद्योजकांनी आज मिलिंद मोहिते यांची सदिच्छाभेट घेतली .
यावेळी ते बोलताना पुढे म्हणाले,आधुनिक तंत्रज्ञानाची सीसीटीव्ही कॅमेरे एमआयडीसी मध्ये बसवल्यास गुन्हेगारांवर पाळत ठेवून जेरबंद करणे शक्य होणार आहे, उद्योगांनी यासाठी पुढाकार घ्यावा.बारामती एमआयडीसीमध्ये राज्यातील इतर औद्योगिक वसाहतींच्या तुलनेत कायदा सुव्यवस्था उत्तम आहे.येथे अधुन मधुन डोके वर काढणाऱ्या गैरप्रकारांना उद्योगांच्या सहकार्याने आळा घातला जाईल, अशी ग्वाही अप्पर पोलीस अधीक्षक मोहिते यांनी दिली.असोसिएशनचे अध्यक्ष जामदार म्हणाले, लॉक डाऊन मुळे उद्योग क्षेत्र अगोदरच प्रचंड आर्थिक अडचणीत सापडले आहे.त्यातच आता भुरट्या चोरां मुळे उद्योजकांना आर्थिक व मानसिक फटका निष्कारण सहन करावा लागत आहे.पोलिसांनी यातील गुन्हेगारांचा शोध घेऊन कडक कारवाई करावी तसेच तक्रारदार उद्योजक व कामगारांना नाहक त्रास होऊ देऊ नये. अशा त्रासामुळे उद्योजक तक्रार करण्यास धजावत नाहीत , गुन्हेगारांना मोकळे रान मिळते.बारामती एमआयडीसीमध्ये २५ हजारांपेक्षा अधिक कामगार काम करतात. त्यात परप्रांतीय व महिला कामगारांचे प्रमाण लक्षणीय आहे. एमआयडीसीसाठी स्वतंत्र पोलिस अधिकारी नेमावा, पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या देखील वाढवावी ,अशी मागणी जामदार यांनी यावेळी केली.दरम्यान बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन च्या वतीने भुरट्या चोरींच्या संदर्भात बारामती ग्रामीण पोलिस स्टेशनला सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश लंगुटे यांच्याकडे निवेदन देण्यात आले.———————————