पुणे : कोरोना आपत्तीत अर्थव्यवस्था कोलमडली असताना राज्यात पुणे महापालिकेने मात्र मिळकतधारकांसाठी अभय योजना राबवून आपले मिळकत कराचे उत्पन्न वाढवून दाखविले आहे. महापालिकेच्या तिजोरीत काल संपलेल्या आर्थिक वर्षात (सन २०२०-२१) ३१ मार्चपर्यंत मिळकत करातून १ हजार ६६५ कोटी २४ लाख रूपये जमा झाले आहे़
महापालिकेचे कर आकारणी व कर संकलन प्रमुख विलास कानडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकट्या मार्च २०२१ या महिन्यात २४० कोटी ६७ लाख मिळकत करातून जमा झाले आहेत़ तर ३१ मार्च या एकाच दिवशी ६२ कोटी ६३ लाख रूपये मिळकत कर जमा झाला आहे़ कोरोना आपत्तीमुळे लॉकडाऊन, ठप्प झालेले व्यवहार याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावरही झाला होता. त्यातच महापालिकेचा मुख्य आर्थिक स्रोत हा मिळकत कर असल्याने, महापालिकेचे उत्पन्न वाढवण्याचे आव्हान मिळकत विभागासमोर होते. त्यामुळे मिळकत कर विभागाने अधिकची कामगिरी करून गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जास्त मिळकत कर जमा करून दाखविला आहे. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात ८ लाख ८६३ मिळकतधारकांनी १ हजार ६६५ कोटी २४ लाख रुपये मिळकत कर जमा केला आहे. हा कर गतवर्षीच्या तुलनेत ४०० कोटीने जास्त आहे. सन २०१९-२० मध्ये १ हजार २६२ कोटी ९५ लाख रुपये मिळकतकर जमा झाला होता. मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी राबविण्यात आलेल्या अभय योजनेचा यावर्षी मोठा फायदा झाला आहे़ त्यातच मिळालेल्या करात महापालिका हद्दीत नव्याने समावेश झालेल्या ११ गावांमधून १५८ कोटी २३ लाख कर जमा झाला आहे.
ज्या मिळकतींना अद्यापही मिळकतकर लागू झालेला नाही, अशा ४७ हजार ६७१ मिळकती या आर्थिक वर्षात मिळकत कराच्या कक्षेत आणल्या गेल्या. त्यांच्याकडून ३९८ कोटी ३६ लाख कर जमा होणे अपेक्षित होते. मात्र २२६ कोटी ४७ लाख रुपये कर जमा झाला आहे. दुसरीकडे महापालिकेने आर्थिक वर्षात मिळकत कर न भरणाऱ्या ४९३ मिळकती जप्त करून सील केल्या असून यापैकी १४ मिळकतींवर पालिकेचा बोजा चढवण्यात आल्याचेही कानडे यांनी सांगितले.
---------------------