पुणे - शेअर बाजारात दीर्घ मुदतीसाठी तुमचे पैसे गुंतवून १८ ते २२ टक्के परतावा देतो, असे सांगून जवळपास ४०० जणांची कोट्यवधीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
खडक पोलिसांनी याप्रकरणी महेशकुमार भगवानदास लोहिया (रा. शिवसागर रेसिडेन्सी, सिंहगड रोड) आणि सुनिल पुरुषोत्तम सोमाणी (रा. रविराज हेरिटेज, बोपोडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शुक्रवार पेठेतील शिवकन्या अँड शिवकन्या इन्व्हेस्टमेंट येथे नोव्हेंबर २०१६ ते २१ सप्टेंबर २०१९ दरम्यान घडल्याची माहिती मिळत आहे.
पिंपळे निलख येथील एका ५१ वर्षांच्या महिलेने याप्रकरणी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, अनेक जणांनी सुनिल सोमाणी यांच्याकडून विमा पॉलिसी घेतल्या आहेत. सोमाणी याने महेशकुमार लोहिया हे शेअर मार्केटमध्ये तुमचे पैसे गुंतवून तुम्हाला चांगला परतावा देतील, असे सांगून त्यांच्याशी संपर्क करुन देत होते. लोहियाने दीघ मुदतीसाठी तुमचे पैसे गुंतवित आहे, असे सांगून त्यांना १८ ते २२ टक्के परतावा मिळेल, असे आश्वासन देत होता. या महिलेने देखील त्याचे ऐकून आपल्याकडील १० लाख रुपये त्याच्याकडे गुंतविले होते. लोहिया याने त्यांना त्यांच्या खात्याची खोटी माहिती देऊन तुमचे पैसे वाढत असल्याचे सांगत असे. प्रत्यक्षात त्याने ते १० लाख रुपये स्वत:चे खात्यात जमा केले. प्रत्यक्षात शेअर मार्केटमध्ये पैसे न गुंतविता २५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून या दोघांचे फोन बंद असून त्यांचे ऑफिसही बंद आहेत ते लक्षात आल्यावर या महिलेप्रमाणेच आणखी १८ जणांनी खडक पोलिसांकडे धाव घेतली. तसेच त्यांनी ही आपली फसवणूक केल्याची तक्रार दिली आहे. त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत ७ कोटी ६ लाख ३४ हजार ३३२ रुपयांची फसवणूक केल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. या दोघांनी सुमारे ४०० जणांची कोट्यवधींची फसवणूक केली आहे. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहे.