खोडद : जगात दरवर्षी दीड लाख लोक सर्पदंशाने मृत्युमुखी पडतात. सुमारे ४ लाख लोकांना सर्पदंशामुळे कायमचे शारीरिक व मानसिक अपंगत्व येते, तर भारतात दरवर्षी ५० ते ६० हजार लोकांचा मृत्यू होतो. महाराष्ट्रात दरवर्षी ३० ते ३१ हजार लोकांना सर्पदंश होतो. यापैकी ३ ते ४ हजार जणांचा मृत्यू होतो. सर्पदंश जनजागृती दिवस साजरा केल्यामुळे जगात गेल्या दोन वर्षांपासून प्रथमच या विषयाची गांभीर्याने दखल घेतली जात असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेचे सर्पदंश तज्ज्ञ समितीचे सदस्य डॉ. सदानंद राऊत यांनी दिली.
जागतिक आरोग्य संघटनेने सर्पदंशाविषयी माहिती संकलन करण्याचे काम सुरू केले आहे. जगात ३ हजार ९०० प्रकारचे साप आहेत. जागतिक सर्पदंश जनजागृती दिनानिमित्त नुकत्याच आयोजित केलेल्या ऑनलाईन जागतिक स्तरावरील परिषदेत डॉ. सदानंद राऊत यांनी मार्गदर्शन केले. या परिषदेत ४० देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. डॉ. राऊत यांनी सुरू केलेला ‘शून्य सर्पदंश मृत्यूदर प्रकल्प’ हा संपूर्ण भारत आणि जगाला मार्गदर्शक ठरेल, असे जगभरातील सर्पदंश तज्ज्ञांचे मत आहे. डॉ. राऊत यांनी आतापर्यंत सर्पदंश झालेल्या ५ हजार ५०० रुग्णांचा जीव वाचविला आहे. त्यांच्या प्रयत्नांची आता जागतिक स्तरावर सर्पदंश तज्ज्ञांनी दखल घेतली आहे. ऑस्ट्रेलिया, नेपाळ व ऑक्सफर्ड विद्यापीठ लंडन या ठिकणी देखील त्यांची सर्पदंशावर व्याख्याने झाली आहेत.
डॉ. सदानंद राऊत व डॉ. पल्लवी राऊत यांनी १९९० च्या दशकात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सर्पदंशावर उपचार करायला सुरुवात केली. अपुरी वैद्यकीय यंत्रणा, विजेचा लपंडाव, प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी व परिचारिकांचा अभाव अशा परिस्थितीत डॉ. राऊत यांनी सर्पदंश झालेल्या एक एक रुग्णावर उपचार करत आतापर्यंत हजारो रुग्णांचा जीव वाचविला आहे.
चौकट
सर्पदंश व विषबाधा झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या भारतातील महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये या डॉ. राऊत यांच्या रुग्णालयाची गणना केली जाते. केवळ सर्पदंशाच्या रुग्णांवर उपचार करून डॉ. राऊत थांबत नाहीत, तर सर्पदंश होऊच नये यासाठी बारकाईने अभ्यास करून सर्पांचे राहण्याचे ठिकाणे, दंश होण्याच्या वेळा, विषारी, बिनविषारी सर्प ओळखणे, प्रथमोपचार, सर्पदंश झाल्यानंतर काय करावे व काय करू नये, या विषयी आदिवासी भागात आश्रम शाळा, विद्यालये, महाविद्यालये, आशा वर्कर, खासगी व सरकारी वैद्यकीय अधिकारी, वनविभाग व कृषी खात्यातील कर्मचारी यांना शास्त्रीय माहिती देऊन जनजागृती करत आहेत.
कोट
सर्पदंश झालेले अनेक रुग्ण काही मिनिटांतच दगावतात. विषारी सर्पदंश झालेले अनेक रुग्ण शेवटचा श्वास घेत असताना किंवा हृदय बंद पडलेल्या अवस्थेत शेवटच्या क्षणी हॉस्पिटलमध्ये दाखल होत असतात. अशा अत्यवस्थ रुग्णांना वाचविणे हे मोठे आव्हान आहे. भविष्यात जुन्नर तालुक्यातील प्रत्येक गावागावांत जाऊन ग्रामस्थ व विद्यार्थ्यांना सर्पदंश व उपचार याविषयी मार्गदर्शन करणार आहे.
- डॉ. सदानंद राऊत, सर्पदंशतज्ज्ञ व सदस्य सर्पदंशतज्ज्ञ समिती, जागतिक आरोग्य संघटना
फोटो : मेल वर देखील फोटो आणि बातमी पाठवली आहे.
180921\20210917_124451.jpg
कॅप्शन - डॉ.राऊत यांच्या हॉस्पिटलमध्ये सध्या सर्पदंश झालेल्या १० गंभीर रुग्णांवर उपचार सुरू आहेत.यात ८ जणांना घोणस, एकाला नाग व एकाला मण्यारचा दंश झाला आहे.