पुणे : शहरातील वाहतूक कोंडी होणारे ४१ चौक आणि ३० अपघात प्रवण क्षेत्रांसह, महापालिकेकडून विकसित करण्यात येत असलेल्या १५ आदर्श रस्त्यांचीही पाहणी पालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पाेलिस आयुक्त अमितेश कुमार हे करणार आहेत. त्यामध्ये सुरवातीला पुणे विघापीठ, वाघोली चौक, कात्रज चौक, मुंढवा चाैक, हडपसर गाडीतळ चौक, खडी मशीन चौक, वारजे, लोहगाव आणि विश्रांतवाडी चौक या दहा चौकांचा समावेश आहे. शहरातील वाहतूक कोंडीबाबत पोलीस आयुक्त कार्यालयात महापालिका आणि पोलिसांची संयुक्त बैठक झाली. यात दोन्ही प्रशासनांनी एकत्र येऊन वाहतुक कोंडीवर काम करण्याचे निश्चित केले आहे. यावेळी शहरातील वाहतूक समस्यांचे सादरीकरण करण्यात आले आहे. त्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत यावर चर्चा झाली. यावेळी पोलीस आयुक्तांनी सादरीकरणाला प्रतिसाद त्यात सुचवलेल्या उपाययोजना तत्काळ करण्याच्या सूचना पोलीस अधिकार्यांना दिल्या. या उपाययोजना केल्यानंतर त्याचा अहवालही पुढील बैठकीत सादर करण्यास सांगण्यात आले. यावेळी दोन्ही आयुक्त आणि वाहतूक पोलीस उपायुक्तांनी शहरातील वाहतूक कोंडी होणारे ४१ चौक आणि ३० अपघातप्रवण क्षेत्रांची संयुक्त पाहणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये सुरवातीला दहा चौकांचा समावेश आहे.
शहरातील मिसिंग लिंकसह, वाहतुक कोंडी, अपघातांची ठिकाणे येथे पालिकेककडून उपाययोजना सुरू आहे. चौकामधील अतिक्रमणे हटविली जाणार आहे. पोलीस आयुक्त महापालिका आयुक्त शहरात लवकरच संयुक्त पाहणी करणार आहेत. - विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका