सातगाव पठारावरील गावांत बटाटा हे प्रमुख पीक या भागांत मोठ्या प्रमाणावर दरवर्षी घेतले जाते. दरम्यान, मागील वर्षी सप्टेंबर २०२० मध्ये परिसरातील पेठ, कुरवंडी, थुगाव, पारगाव तर्फे खेड तसेच आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने बटाटा, फळबागांचे, शेतमालाचे अतोनात नुकसान झाले होते. काढलेला बटाटा देखील अरणीमध्येच सडल्याने शेतकरी पूर्ण अडचणीत सापडला होता. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या सूचनेनुसार आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विष्णू हिंगे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, पं. स. उपसभापती संतोष भोर, संतोष धुमाळ यांनी परिस्थितीची पाहणी दौरा केला होता. तसेच कृषी, महसूल, प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत पंचनामे देखील करून घेतले होते. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून रूपये ४१ लक्ष मंजूर करण्यात आले आहेत. दरम्यान, पारगाव तर्फे खेड येथील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा होण्यास तांत्रिक अडचणी होत होत्या. याबाबत शेतकऱ्यांनी विवेक वळसे पाटील यांना भेटून अडचणी सांगितल्या असता त्यांनी तत्काळ आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांच्याशी संपर्क करून या अडचणी दूर करून दिल्या. खरीप हंगामाच्या तोंडावर या मदतीने बी-बियाणे खरेदी, शेती मशागत आदी कामांसाठी आर्थिक मदत उपलब्ध होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना ४१ लाखांची भरपाई मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 4:09 AM