लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : यंदा मॉन्सूनने नेहमीपेक्षा अधिक वेगाने देशभराच्या विविध भागात आगमन केल्याने यंदा देशात सर्वत्र चांगला पाऊस झाल्याचे दिसून येत आहे. सौराष्ट्र, कच्छ, ईशान्यकडील राज्ये, जम्मू काश्मीर आणि आंध्र प्रदेशातील किनारपट्टी या भागात आतापर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहिले आहे. २० जूनपर्यंत देशात सरासरीपेक्षा ४१ टक्के अधिक पाऊस झाला आहे.
मध्य भारतात सर्वाधिक पाऊस झाला आहे. देशभरातील ३६ हवामान विभागांपैकी ८ विभागांत सरासरीपेक्षा - २० ते ६० टक्के कमी पाऊस झाला आहे. तर, १९ विभागात सरासरीच्या तुलनेत १६० टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे. ५ विभागांत सरासरीपेक्षा १२० टक्के पाऊस झाला आहे. ४ विभागांत सर्वसाधारण पाऊस झाला आहे.
मॉन्सूनचे यंदा आगमन हे पश्चिमेकडून लक्ष्यद्वीपकडून झाले. तरीही त्यानंतर लक्ष्यद्वीप समूहावर मॉन्सूनच्या पावसाचा जोर राहिला नाही. त्यामुळे लक्ष्यद्वीपला सरासरीपेक्षा ४७ टक्के कमी पाऊस झाला आहे. मॉन्सूनचे केरळमध्ये नेहमीपेक्षा ३ दिवस उशिरा आगमन झाले. आगमनानंतर पावसात खंड पडल्याने केरळमध्ये आतापर्यंत सरासरीपेक्षा -१५ कमी पाऊस झाला आहे. त्याचप्रमाणे सौराष्ट्र, कच्छ परिसरात शनिवारी मॉन्सूनचे नेहमीपेक्षा अगोदर आगमन झाले आहे. या भागातही -३३ टक्के कमी पाऊस झाला आहे. जम्मू काश्मीर - २६ टक्के, अरुणाचल प्रदेश - २३, आसाम, मेघालय - २१ टक्के कमी पाऊस झाला आहे.
देशभरात सर्वाधिक पाऊस पूर्व उत्तर प्रदेशात सरासरीपेक्षा तब्बल २२५ टक्के अधिक झाला आहे. पूर्व मध्य प्रदेश १६० टक्के, बिहार १४९ टक्के, उत्तराखंड १२८ टक्के पाऊस झाला आहे. पश्चिम राजस्थानात अजून मॉन्सून पोहोचला नाही. तरीही तेथे सरासरीपेक्षा ११० टक्के पाऊस झाला आहे.
महाराष्ट्रात कोकणात सरासरीच्या दुप्पटीहून अधिक १११ टक्के पाऊस झाला आहे. राज्याच्या चारही हवामान विभागांत आतापर्यंत चांगला पाऊस झाला आहे.
१ जून ते २० जूनपर्यंत राज्यात पडलेला पाऊस (मिमी)
विभाग प्रत्यक्ष पडलेला पाऊस सरासरी पाऊस टक्केवारी
कोकण ७३५.९ ३४९.२ १११
मध्य महाराष्ट्र १५२.४ ८६.२७ ७६
मराठवाडा १३१ ७९.७ ६५
विदर्भ १४५ ७९.४ ८३
.............
चार जिल्ह्यांत कमी पाऊस
धुळे -२९ टक्के, नंदुरबार -४६ टक्के, सोलापूर - ५ टक्के, अकोला - ४० टक्के पाऊस कमी झाला आहे.
कोकणातील सर्व जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूप अधिक पाऊस झाला आहे. मुंबई उपनगर भागात सरासरीपेक्षा २१३ टक्के, कोल्हापूर २०० टक्के, सांगली १८०, सातारा १७६ टक्के, पुणे १२७ टक्के अधिक पाऊस झाला आहे. विदर्भातील चंद्रपूर १२४ टक्के, यवतमाळ ११३ टक्के आणि परभणी १३९ टक्के अधिक पाऊस झाला आहे.