पुणे : येरवडा येथील एका खासगी क्लासचालकाने छापलेल्या बारावीच्या चुकीच्या वेळापत्रकावर निष्काळजीपणे विश्वास ठेवून सकाळच्या पेपरसाठी दुपारी पोहोचलेल्या तब्ब्ल ४१ विद्यार्थ्यांना बारावीचा भूगोल विषयाचा पेपर देण्यापासून मुकावे लागले आहे. येरवडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेत हा प्र्रकार घडला.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांनी सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत परीक्षा देणे अपेक्षित होते. मात्र, चुकीचे वेळापत्रक पाहून विद्यार्थी दुपारी २ नंतर परीक्षा केंद्रावर पोहोचले. परिणामी, या विद्यार्थ्यांना पेपर देता आला नाही. विद्यार्थ्यांना परीक्षेचे नियोजन करता यावे, या उद्देशाने राज्य मंडळातर्फे तब्बल वर्षभर आगोदर दहावी-बारावी परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले जाते. त्याचप्रमाणे परीक्षा सुरू होण्यापूर्वी काही दिवस सर्व शाळा-महाविद्यालयांकडे वेळापत्रक पाठविले जाते. विद्यार्थ्यांनी केवळ मंडळातर्फे प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षा द्यावी; इतर खासगी संस्थांनी प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकाचा आधार न घेता मंडळाच्या अधिकृत वेळापत्रकाचा अवलंब करावा, असे आवाहन वेळोवेळी करण्यात आले. मात्र, येरवडा येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शाळेतील विद्यार्थी बुधवारी भूगोलच्या पेपरसाठी अधिकृत वेळात्रकातील वेळेनुसार सेंट मीराज या परीक्षा केंद्रावर गेले नाहीत.खासगी क्लासचालकाने स्वत: बारावीचे परीक्षेचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यात बारावीचा भूगोल विषयाचा पेपर दुपारी ३ ते सायंकाळी ६ या वेळेत असल्याचे छापले. त्यानुसार नेताजी शाळेतील विद्यार्थी दुपारी दोननंतर परीक्षा केंद्रावर पोहोचले; परंतु तोपर्यंत पेपर संपलेला होता. विद्यार्थ्यांना आपली चूक लक्षात आली. वर्षभर अभ्यास करूनही पेपर देता येणार नसल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर रडण्यास सुरुवात केली. दरम्यान, पालकांनीही परीक्षा केंद्राकडे धाव घेतली. (प्रतिनिधी)
४१ विद्यार्थ्यांचा बारावीचा पेपर बुडाला
By admin | Published: March 10, 2016 12:54 AM