बारामती : बारामती तालुक्याच्या जिरायती भागात जलयुक्त शिवार अभियानातून मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंत प्रशासनाने ४१० कामे पूर्ण केली आहेत. तर, १०५ कामे प्रगतिपथावर असून, ४५ कामे नव्याने सुरू करण्यात आली आहेत. या झालेल्या कामांमधून जिरायती भागात पावसाळ्यात ६ हजार ७६१ टीसीएम पाण्याचा साठा होईल, असा प्रशासनाचा अंदाज आहे. या कामांवर आतापर्यंत २३ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी बारामती तालुक्यातील जिरायती भागाबरोबरच बागायती भागालाही दुष्काळाच्या समस्येने ग्रासले. शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही अतिगंभीर झाला. तालुक्याचा जिरायती भाग दुष्काळाच्या समस्येने सतत चार वर्षे होरपळत आहे. दुष्काळावर उपाय शोधण्याचे प्रयत्नही शासनस्तरावरून सुरू आहेत. काळखैरवाडीमध्ये सर्वाधिक ७० कामे करण्यात आली आहेत. यातील ६५ कामे पूर्ण झाली असून, ४ कामे प्रगतिपथावर आहेत. त्याबरोबरच जोगवडी, खराडेवाडी, तरडोली, पानसरेवाडी, काऱ्हाटी, वढाणे, चांदगुडेवाडी-खंडूखैरवाडी, भोंडवेवाडी, दंडवाडी, बाबुर्डी, शिर्सुफळ, साबळेवाडी, मुर्टी, पारवडी, गाडीखेल आदी जिरायती गावांमध्ये या अभियानांतर्गत कामे करण्यात आली आहेत. पिण्याच्या पाण्यासाठी जिरायती भागात ३४ वर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील २२ गावांसह परिसरातील २५५ वाड्यावस्त्यांवरील ७० हजार ४२२ लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
बारामती तालुक्यात ४१० कामे
By admin | Published: June 04, 2016 12:28 AM