पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे आॅनलाईन पध्दतीने अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. प्रवेश अर्ज भरण्यास १४ ऑगस्टपासून सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी २० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी अर्ज केला होता. मात्र, सलग दोन दिवस सुट्टी असल्याने अधिकाधिक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज केला. एकूण ४१ हजार ५७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून २५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज लॉक केला आहे. तर १८ हजार ८०८ विद्यार्थ्यांचे अर्ज तपासून झाले आहेत.
अकरावी ऑनलाईन केंद्रीय प्रवेश समितीच्या सदस्य सचिव व सहायक शिक्षण संचालक मीना शेंडकर म्हणाल्या, रविवारी अकरावी प्रवेशाबाबत ऑनलाईन पध्दतीने मार्गदर्शनपर कार्यशाळा घेण्यात आली. त्यात विद्यार्थी व पालकांना प्रवेशाबाबत मार्गदर्शन केले. काही पालकांनी इनहाऊस कोटा, व्यवस्थापन कोट्याबाबत माहिती विचारली. तसेच इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे गुण अकरावी प्रवेशासाठी कनव्हर्ट कसे केले जातात, याबाबत पालक व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
-------------------------