पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे इयत्ता बारावीचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया सुरू असून, येत्या ३१ जुलैपूर्वी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, राज्यातील ४१४ विद्यार्थ्यांशी संपर्कच होऊ न शकल्याने उर्वरित विद्यार्थ्यांचा निकाल तयार करण्यात आला आहे. तसेच दहावीप्रमाणेच बारावीचा निकालही सर्व विक्रम मोडीत काढणार असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे.
कोरोनाचा पार्श्वभूमीवर राज्य शासनाने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. निकाल तयार करण्यासाठी इयत्ता दहावी, अकरावीच्या आणि बारावीच्या अंतर्गत गुणांचा आधार घेतला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रत्येक विद्यार्थ्याशी संपर्क साधला. अंतर्गत गुण देण्यासाठी काही महाविद्यालयांकडून संबंधित विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात आल्या. मात्र, वर्षभर महाविद्यालयाशी कोणताही संपर्क साधला नाही, अशा विद्यार्थ्यांचा निकाल तयार करता आला नाही.
राज्य मंडळातर्फे घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेसाठी राज्यातील १३ लाख १७ हजार ७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांचे दहावी, अकरावी आणि बारावीचे गुण संकलित करून राज्य मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये भरले. त्यामुळे निकाल तयार करण्यचे काम अंमित टप्प्यात आहे. येत्या ३१ एप्रिलपर्यंत निकाल जाहीर करण्याचा राज्य मंडळाचा प्रयत्न आहे.
कोरोनामुळे झालेले स्थलांतर, बदलेला मोबाईल क्रमांक आदी कारणांमुळे राज्यातील ४१४ विद्यार्थ्यांपर्यंत कनिष्ठ महाविद्यालयांना पोहचता आले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा निकाल तयार करता आला नाही, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
----------------