पुणे : स्वत:च्या मोकळ्या जागेत पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी ऑनलाइन जाहिरात वाचून संपर्क करणे एकाला चांगलेच महागात पडले. पेट्रोल पंपाची डीलरशिप देण्याच्या बहाण्याने कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवत एका व्यक्तीला सायबर चोरट्यांनी तब्बल ४२ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार दि. ४ ते १७ ऑगस्ट २०२१ या कालावधीत घडला.
याप्रकरणी मान हिंजवडी फेज एक येथील ५० वर्षीय व्यक्तीने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इरफान अमजअली (रा. पश्चिम बंगाल), शर्मिला कुमारी (रा. बिहार), रीना कुमारी (रा. टी चॅपलरोड, रनवार बांद्रा) मोबाइलधारक यादव अशा चौघांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांच्याकडे स्वतःची पेट्रोलपंप सुरू करण्याऐवढी मोकळी जागा आहे. त्यांना ऑनलाइन माध्यमातून पेट्रोलपंपाच्या जाहिरातीची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी तेथे संपर्क केला. मात्र, प्रत्यक्षात तो सायबर चोरट्यांचा सापळा होता. फिर्यादी अलगद त्यांच्या जाळ्यात अडकले.
आरोपींनी फिर्यादींना आयओएल पेट्रोल पंपाची डीलरशिप देण्याचे प्रलोभन दाखवून कंपनीचे अधिकारी असल्याचे भासवून विश्वास संपादन केला. त्यानंतर फिर्यादींकडून वेळोवेळी ४२ लाख २५ हजार रुपये ऑनलाइन घेतले. दरम्यान पैसे भरूनदेखील कोणतीही डीलरशिप मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने वारंवार त्यांच्यासोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.