लोकमत न्यूज नेटवर्क
सुषमा नेहरकर-शिंदे
पुणे : जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील २७ आणि पुरंदर तालुक्यातील १५ गावांनी सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेत सहभाग घेतला आहे. प्रसिद्ध अभिनेता आमिर खान यांच्या ‘पानी’ फाऊंडेशनच्या वतीने ही स्पर्धा घेतली जात आहे. जिल्ह्यातील अन्य सर्व यंत्रणा या गावांच्या समृध्दीसाठी एकत्र येणार आहेत.
गेल्या काही वर्षांपासून ‘पानी’ फाऊंडेशनच्या वतीने राज्यातील दुष्काळग्रस्त भागात वाॅटर कप स्पर्धा घेऊन लोकसहभागातून गावे जलयुक्त करण्याचा प्रयत्न केला. आता या स्पर्धेला व्यापक स्वरूप दिले आहे. गावात केवळ जलयुक्तसाठीच नाही तर गावांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने काम करणार आहे. समृद्ध गाव स्पर्धेत जलव्यवस्थापन, मृदा व जलसंधारण, पौष्टिक गवताचे संरक्षित कुरण, वृक्षलागवड, मातीची सुपीकता वाढविणे आणि गावकऱ्यांचे दरडोई उत्पन्नात वाढ करणे हे प्रमुख उद्देश ठेवून गावांचा सर्वांगीण विकासासाठी जास्तीत जास्त लोकसहभाग व प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीने विविध कामे करणार आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी नुकताच या तालुक्यांचा दौरा करून समृद्ध गाव स्पर्धेत सहभागी झालेल्या गावांचा देखील आढावा घेतला. या गावाच्या विकासासाठी आता जिल्ह्यातील सर्व यंत्रणा म्हणजेच जिल्हा परिषद, कृषी विभाग, रोजगार हमी योजना, महसूल यंत्रणा एकत्र येऊन काम करणार आहेत.
--
गावांच्या विकासाठी सर्व यंत्रणांनी एकत्र व समन्वयाने काम करावे
बारामती आणि पुरंदर तालुक्यातील २७ गावांचा खऱ्या अर्थाने सर्वागीण विकास करायचा असेल तर जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी एकाच वेळी एकत्र येऊन व समन्वय साधून कामे केली पाहिजेत. यासाठी जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही पुढाकार घेत आहे. या संदर्भात नुकतीच आढावा बैठक घेऊन सर्व यंत्रणांना तसे आदेश दिले आहेत.
डाॅ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी