लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे जिल्ह्यात सुमारे 4 हजार 416 शाळा असून, आजही तब्बल 421 शाळांचा पोषण आहार चुलीवर शिजवला जातो. परंतु शासनाने आता शंभर टक्के शाळांना गॅस कनेक्शन देण्याचा निर्णय घेतला असून, जिल्ह्यातील 421 शाळांची चुलीच्या धुरापासून सुटका होणार आहे.
शहरी भागात खासगी संस्थांच्या मदतीने सेंट्रल किचन प्रणालीद्वारे अन्न शिजवून विद्यार्थ्यांना वाटप केले जाते. पण ग्रामीण भागात आजही प्रत्येक शाळांमध्येच हे अन्न शिजवून विद्यार्थ्यांना वाटप केले जाते. यात आजही अनेक शाळांमध्ये चुलीवरच अन्न शिजवण्यात येते. यातील धुरामुळे प्रदूषण निर्माण होते. ही समस्या सोडविण्यासाठी शासनाने शाळांना कनेक्शन देण्याची योजना आणली व त्याची अंमलबजावणी गत काही वर्षांपासून सुरू केली आहे. यामुळे निर्णयामुळे शाळांमधून चूल गायब होणार आहे. शाळांना गॅस कनेक्शन देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडून निधी दिला जातो.
--------
कनेक्शन देण्यासाठीची कार्यपद्धती
प्राथमिक शिक्षण संचालकांनी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये गॅस कनेक्शनबाबत सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवले होते. या अहवालातून बऱ्याचशा प्राथमिक शाळांना गॅस कनेक्शन नसल्याची बाब समोर आली. त्यावर शिक्षण संचालकांच्या मार्गदर्शनाखाली सहसंचालकांनी पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेडच्या राज्यस्तरीय प्रतिनिधींवर बैठक घेतली. या चर्चेअंती नवीन कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
---
जिल्ह्यातील एकूण शाळा - 4 हजार 416
-------
गॅस नसलेल्या शाळा : 421
आंबेगाव 18, बारामती 0, भोर 12, दौंड 1, हवेली 18, इंदापूर 3, जुन्नर 27, खेड 27, मावळ 169, मुळशी 3, पुरंदर 62, शिरूर 37, वेल्हा 44
--------
जिल्ह्यातील शंभर टक्के शाळांना आता गॅस कनेक्शन
शासनाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून शाळांना गॅस कनेक्शन देण्यात येत आहे. जिल्ह्यात आजही सुमारे 421 शाळांना गॅस कनेक्शन नाही. या ठिकाणी चुलीवरच पोषण आहार शिजवून मुलांना दिला जातो, पणा आता शंभर टक्के शाळांना गॅस कनेक्शन देण्यात येणार आहे.
सुनील कु-हाडे, जिल्हा शिक्षणाधिकारी