चासकमान : उजनी धरणात पाणी सोडण्याचा प्राधिकरणाने निर्णय आजही राखून ठेवला आहे. मात्र , ज्या चासकमान धरणातून ३ टिएमसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता, त्या धरणात आता फक्त ४.२४ टिएमसीच पाणी शिल्लक आहे. मग यातील किती पाणी उजनीत सोडणार व किती पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी शिल्लक राहणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. चासकमान धरणातून उजनीत पाणी सोडण्याच्या निर्णयानंतर येथील शेतकरी हादरला होता. धरणाची क्षमता ३ टिएमसी आहे. त्यातील शेतीसाठी ११२ दलघमी राखीव आहे. यातील ७३ दलघमी पाणी सोेडण्याचे पूर्वीचे आदेश होते. या आदेशानुसार चासकमानच्या लाभक्षेत्रासाठी ३९ दलघमी पाणी शिल्लक राहणार होते. यातील पाण्यातून चासकमान लाभक्षेत्रासाठीचे आवर्तन सुरू आहे. यात पिण्याच्या पाण्याचाही समावेश आहे. यामुळे याच आवर्तनात हे पाणी संपणार आहे. मग पुढील सात महिने यांच्या शेतीसाठी पाणीच मिळणार नाही. पिकं जळून जातील या चिंतेने शेतकरी संतप्त झाले होते. हे पाणी सोडण्यास विरोध करीत होते. उच्च नायालयाने प्राधाकिरणाचा निर्णय रद्द करून पुन्हा नव्याने निर्णय घेण्याचे आदेश दिले होते. मात्र आजही निर्णय होवू शकला नाही. त्यामुळे त्यांची चिंता कायम राहिली आहे.चासकमान धरणाची आजची स्थिती जाणून घेतली असता धरणात फक्त ४. २४ टिएमसी उपयुक्त साटा शिल्लक राहिला आहे. शिरूर व खेड तालुक्यास वरदान ठरलेल्या चासकमान धरणातून दि. १६ नोव्हेंबर रोजी डाव्या कालव्यास रब्बी आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली. यामुळे कांदा, गहू, हरभरा व चारा पिकांना मोठा फायदा झाला. चाळीस दिवसांच्या आवर्तनामध्ये धरणातील पाणी ७८ टक्क्यांवरून थेट ५५ टक्क्यांवर आले आहे. चाळीस दिवसांच्या आवर्तनात २३ टक्के पाणीसाठा कमी झाला आहे. धरणात १४५.९४ द.ल.घ.मी. म्हणजे ५.२ टिएमसी एकूण साठा तर ११८.७५ द.ल.घ.मी. म्हणजे ४.२४ टिएमसी उपयुक्तसाटा शिल्लक आहे. आवर्तन अजुनही सुरूच आहे. डाव्या कालव्यास ५५० क्युसेक्स वेगाने सोडण्यात आलेले पाणी आजपासुन कमी करून १०० क्युसेक्स करण्यात आले आहे. त्यामुळे हा साठा अजूनही कमी होणार आहे. त्यामुळे जर प्राधिकरणाने पाणी सोडण्याचा निर्णय पुन्हा नव्याने घेतला तर पाण्याची येथे गंभीर परिस्थिती निर्माण होणार आहे. (वार्ताहर)
चासकमानमध्ये ४.२४ टीएमसीच साठा
By admin | Published: December 25, 2015 1:56 AM