पुणे : दिलेले टास्क पूर्ण केल्याचा चांगला परतावा मिळेल तसेच गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून दोन महिलांसह एकाची ४३ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ, सिंहगडरोड, येरवडा आणि विमानतळ पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. ३०) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या घटनमध्ये येरवडा परिसरात राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेला वर्क फ्रॉम होम द्वारे चांगले पैसे कमावता येतील असे आमिष दाखवून तब्बल २३ लाख ३३ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. मात्र परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झळयाचे महिलेला लक्षात आले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कांचन जाधव हे करत आहेत.
दुसऱ्या घटनेमध्ये विमानतळ परिसरात राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेला टास्क पूर्ण केल्यास चांगला मोबदला देण्याचे आमिष दाखवून वेगवगेळी कारणे सांगून तक्रारदार यांना एकूण १२ लाख २० हजार रुपये भरण्यास सांगून फसवणूक केली.
तिसऱ्या घटनेमध्ये, सिंहगडरोड परिसरात राहणाऱ्या एका ३१ वर्षीय व्यक्तीला ६ लाख ९७ हजार रुपये भरण्यास भाग पाडून त्यांची फसवणूक केली आहे.