पुणे : कोरोनाचा डेल्टापेक्षा भयंकर विषाणू दक्षिण आफ्रिकेत आढळल्याने एकीकडे जगभराची चिंता वाढली आहे. मात्र, जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेच्या प्रयत्नामुळे जिल्ह्यातील जवळपास ४४३ गावांतील नागरिकांचे दोन्ही डोस पूर्ण केल्याने ही गावे १०० टक्के लसवंत बनली आहेत. वाढत्या लसीकरणामुळे जिल्ह्याचा कोरोनाबाधित दर घटला आहे. तसेच मृत्यूदरातही घट झाली आहे. यामुळे पुणे जिल्ह्याची वाटचाल १०० टक्के निर्बंधमुक्तीकडे होत आहे.
पुणे जिल्ह्यात लसीकरणासाठी विशेष मोहिमा जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, तसेच आरोग्य विभागातर्फे राबविण्यात आल्या. जिल्ह्यात आतापर्यंत १ कोटी ३० लाख जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. राज्यात लसीकरणाच्या बाबतीत पुणे जिल्हा हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिल्ह्यात १६ नोव्हेंबरला झालेल्या ग्रामसभेत जिल्ह्यातील ४४३ गावांत लसीकरण १०० टक्के पूर्ण केल्याची माहिती पुढे आली आहे. सर्वाधिक मुळशी तालुक्यात १३४ गावे १०० टक्के लसवंत झाली आहेत, तर वेल्हे तालुक्यात ५४, भोरमध्ये ४१, तर इंदापूर तालुक्यात ३८ गावे ही शंभर टक्के लसवंत झाली आहेत. जुन्नर आणि पुरंदरमध्ये लसवंत झालेली गावे सर्वात कमी असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.
जिल्ह्यात लसीकरणासाठी सध्या हर घर दस्तक मोहीम सुरू आहे. यासोबत तरुणांच्या लसीकरणासाठीही विशेष मोहीम सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत थेट घरी, तर तरुणांना त्यांच्या महाविद्यालयाच्या परिसरात लस दिली जात आहे. ग्रामीण भागात आतापर्यंत ५० लाखाहून अधिक जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
१) १८ वर्षांपुढील लोकसंख्या - ८३ लाख ४२ हजार ७००
पहिला डोस घेतलेले - ८० लाख ५६ हजार ०१२
दोन्ही डोस घेतलेले - ४९ लाख ७५ हजार १२३
२) तालुक्यांची आकडेवारी काय सांगते?
तालुका पहिला डोस दुसरा डोस
हवेली ६२५२०९ ४९२०५८
खेड ३५१६२४ १७६६४०
शिरुर ३०६३०५ १५४०२१
मावळ २९८४४९ १३४९४३
जुन्नर २६८८०८ १३६४२०
बारामती २५९८९१ १३६७५६
इंदापूर २३५३५२ ९६८४३
दौंड २२७८६३ ११३८५२
मुळशी २१८१८४ १५६७१५
आंबेगाव १७८१८९ ९४८३८
पुरंदर १५३९७८ ७४६२७
भोर ९८२१३ ५०७२०
वेल्हा ४४०५४ २३०७६
विदेशातून कोणी आला तर क्वारंटाईन
परदेशातून आलेल्या व्यक्तीची विमानतळावर तपासणी केली जाते. संशयितांना होम क्वारंटाईन, तर काहींना गरजेनुसार शासकीय विलगीकरण केंद्रात कॉरंटाईन केले जाते.
रात्रीच्या वेळीही लसीकरण
जिल्ह्यात सध्या रात्रीच्या वेळीही लसीकरण सुरू आहे. सध्या हर घर दस्तक मोहिमेअंतर्गत लसीकरण सुरू असून जास्तीत जास्त जणांचे दोन्ही डोस तसेच ज्यांचे एकही डोस झालेले नाहीत, अशांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवर रात्रीही लस मिळेल अशी व्यवस्था काही केंद्रांवर करण्यात आली आहे.
''जिल्ह्यातील लसीकरणाचा तुटवडा तूर्तास संपला आहे. लसीकरणाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विशेष मोहिमा राबविण्यात आल्या. यामुळे जिल्ह्यातील ४४३ गावे १०० टक्के लसवंत होऊ शकली. सध्या संपूर्ण जिल्ह्याचे १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट आहे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहेत.''
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद