पुणे: स्वस्तात साखर देण्याच्या आमिषाने किराणा माल व्यापाऱ्याची ४५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी सांगलीतील दोघांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
याप्रकरणी स्वाद फूडस प्रा. लि. चे संचालक विक्रम दिनकर पाटील (४१) आणि दिग्विजय दिनकर पाटील (३८, दोघे रा. अजिंक्यनगर, सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुनील शिवारामजी गेहलोत (३८, रा. सखाई प्लाझा, भेलकेनगर, कोथरुड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना जून २०२३ ते २८ जानेवारी २०२४ या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेहलोत यांचे कोथरूडमधील भेलकेनगर परिसरात बालाजी ट्रेडिंग कंपनी किराणा माल विक्री दुकान आहे. पाटील यांनी साखर कारखान्याकडून स्वस्तात साखर मिळवून देतो, असे आमिष गेहलोत यांना दाखवले होते. गेलहोल यांना १५० टन साखर देतो, असे सांगून त्यांच्याकडून ४५ लाख रुपये घेतले. गेहलोत यांनी ऑनलाइन पद्धतीने पाटील यांच्या खात्यात वेळोवेळी ४५ लाख रुपये जमा केले. त्यानंतर पाटील यांनी त्यांना साखर दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर गेहलोत यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र आळेकर करत आहेत.