पुणे: पुण्यात सुरु असलेल्या पावसाने खडकवासला प्रकल्पातील धरणे भरू लागली आहेत. त्या पार्श्वभूमीवर कालपासून मुठा नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरु आहे. आता पुन्हा सायंकाळी ५ वाजता 35 हजार 2 क्युसेक विसर्ग वाढवून 45 हजार 705 क्यूसेक करण्यात येत आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता असल्याचे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडकवासला धरण ६५ टक्क्यांपर्यत खाली करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत. त्यानुसार विसर्ग वाढवण्यास सुरुवात झाली आहे.
मुठा नदीपात्रात सुरु असलेल्या विसर्गामुळे नदीकाठच्या भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पुणे व पीएमआरडीए अग्निशमन दलाकडून सिंहगड रोड परिसरात एकता नगरी, सरिता नगरी, डेक्कन नदीपाञ, एरंडवणा, खिलारेवाडी, दत्तवाडी, विश्रांतवाडी या भागात उपाययोजना करण्यात येत आहेत. सद्यस्थितीत एकता नगरी येथून २५ तर निंबोज नगर येथून २० नागरिक अशा एकुण ४५ नागरिकांची सुटका करण्यात आली आहे. तर एक श्वान व एक मांजर अग्निशमन दलाच्या जवानांनी सुरक्षितस्थळी हलविले आहे. येरवडा - शांतीनगर व आदर्श नगर येथे पाण्याची पातळी वाढली असून अग्निशमन दलाकडून सुमारे शंभर नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.
दरम्यान भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुणे आणि जिल्हा परिसरात आज जोराचा पाऊस होत असून या पार्श्वभूमीवर संपूर्ण प्रशासनाने सज्ज राहावे. नदी आणि धरण परिसरातील संभाव्य धोकादायक क्षेत्रातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यावे. आवश्यकता वाटल्यास एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि सेनादलाची मदत घेण्यात यावी. लोकांचे स्थलांतर केल्यास त्यांच्यासाठी निवारा, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे महापालिका आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकारी यांना दूरध्वनीद्वारे दिल्या आहेत.