पुणे : महापालिकेच्या हिस्स्याचे पैसे देण्यासाठी स्मार्ट सिटीने महापालिकेकडे मागणी केली असून, याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीसमोर सादर केला आहे. दरम्यान स्मार्ट सिटीने ४६ कोटी रूपयांची मागणी केली असली तरी महापालिका प्रशासनाने ४० कोटी रूपये देण्याबाबतचाच ठराव मांडला आहे़
स्मार्ट सिटीकडून राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबतची माहिती मिळावी, कुठल्या योजना राबविल्या़ आदी प्रश्नांची उत्तरे अद्यापही सर्वपक्षीयांकडून मागितली जात आहे. स्मार्ट सिटीच्या कामाबाबत वेळोवेळी नाराजी व्यक्त केली जात आहे़ त्यामुळे कोरोना आपत्तीच्या काळात पैशाची चणचण असलेल्या महापालिकेकडून येत्या मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत स्मार्ट सिटीची ही मागणी पूर्ण होणार का याबाबत शाशंकता आहे़
केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेतंर्गत पुणे शहर स्मार्ट सिटीाला दरवर्षी १०० कोटींचे अनुदान देण्यात येते. यात महापालिकेस प्रतिवर्षी ५० कोटी रूपयांचा हिस्सा द्यावा लागतो. तर उर्वरित प्रकल्पांचा निधी स्मार्ट सिटीकडून कर्ज तसेच वेगवेगळ्या माध्यमातून उभारण्यात येत आहे.
स्मार्ट सिटीकडून २०२०-२१ या आर्थिक वर्षाकरिताचा हिस्सा महापालिकेकडे मागण्यात आला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने यापूर्वीच स्थायी समितीसमोर ठेवला होता. मात्र, मार्च अखेरीच्या स्थायी समितीच्या दोन्ही सभा तहकूब झाल्याने हा प्रस्ताव १५ दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला होता. येत्या मंगळवारी याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे़