पुणे : ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी वित्त आयोगातून जिल्ह्याला २५५ कोटींचा निधी मिळाला. मात्र, ४६ ग्रामपंचायतींनी अद्यापही निधी खर्च केला नसल्याचे समोर आले. यासंदर्भात दोनवेळा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संबंधित ग्रामपंचायतींच्या सुनावण्या घेतल्या तरीही त्यामध्ये फरक पडला नाही. त्यामुळे आता अशा ग्रामपंचायतींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला आहे. दरम्यान, काही तांत्रिक कारणांमुळे ४६ पैकी १५ ग्रामपंचायतींना निधी खर्च करण्यात अडचणी येत आहेत.
१५ व्या वित्त आयोग निधीच्या विनियोगातून गावांमध्ये दर्जेदार लोकाभिमुख सुविधांची निर्मिती करण्यात यावी, अशी शासनाला अपेक्षा आहे. या निधीतून गावपातळीवर पाण्याचा निचरा आणि पाणीसाठा व्यवस्थापन, मुलांचे लसीकरण व कुपोषण रोखणे, जोडरस्ते आणि ग्रामपंचायतींच्या अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम, दुरुस्ती व देखभाल, स्मशानभूमीचे बांधकाम, स्मशानभूमीसाठी जमीन अधिग्रहण, एलईडी पथदिवे व सौर पथदिव्यांचे बांधकाम व दुरुस्ती, ग्रामपंचायतींमध्ये पुरेशी व उच्च बँडविड्थसह वाय-फाय डिजिटल नेटवर्क सेवा, सार्वजनिक वाचनालय, मुलांसाठी उद्याने, मनोरंजन सुविधा, खेळाचे मैदान, क्रीडा व शारीरिक फिटनेस उपकरणे, ग्रामीण आठवडे बाजार, मूलभूत वीज, पाणी, कचऱ्याचे संकलन व विल्हेवाट, सुका व ओला कचरा व्यवस्थापन उपकरणे, नैसर्गिक आपत्ती, साथीच्या रोगाच्या प्रादुर्भावावेळी मदतकार्य आदी कामे करावयाची आहेत.
जिल्ह्यात १ हजार ३८५ ग्रामपंचायती असून, त्यांना १५व्या वित्त आयोगातून सुमारे २५५ कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. बहुतांश ग्रामपंचायतींनी त्या निधीच्या माध्यमातून कामाला सुुरुवातदेखील केली आहे. मात्र, साधारण ४६ ग्रामपंचायतींनी अद्यापही एक रुपयाचाही खर्च केला नसल्याचे समोर आले आहे. त्यांच्यासंदर्भात दोन वेळा सुनावणी झाली पण तरीही त्यांच्या कामकाजात फरक पडत नाही. त्यामुळे आता खर्च न करणाऱ्या ग्रामपंचायतींवर ३९ (१) अन्वये कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आयुष प्रसाद यांनी दिली. दरम्यान, ४६ पैकी १५ ग्रामपंचायतींना तांत्रिक अडचणींमुळे निधी खर्च करता येत नसल्याचेही समोर आले आहे. अशा ग्रामपंचायतींना काही दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.
तालुकानिहाय ग्रामपंचायतींची संख्या
बारामती- ८
भोर- ५
हवेली- १
इंदापूर- ३
जुन्नर- ८
खेड- ७
मुळशी- ३
पुरंदर- ८
शिरुर- १
वेल्हे- २
एकूण- ४६