हो, हे खरे आहे. रानवडी (ता.वेल्हे ) येथे 'जनसेवा फाउंडेशन' वृध्दाश्रमात पहिला रुग्ण ८ एप्रिल रोजी सापडला त्यानंतर येथील १६८ जणांची कोरानाची चाचणी केल्यानंतर या ठिकाणच्या ४७ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. एकाच वेळी एवढे रुग्ण ते सुध्दा वयोवृध्दांना. त्यामध्ये काहीची प्रकृती इतकी नाजूक की त्यांना बेडवरुन हलता येत नव्हते. मात्र त्यावेळी त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालयात व कोंढावळे येथील कोविड केअर सेंटरमध्ये शंभराहून अधिक रुग्ण असल्याने बेड शिल्लक नव्हते त्यामुळे त्यांच्यावर वृध्दाश्रमातच उपचार केले गेले. त्याला उत्तम प्रतिसाद देत या रुग्णांनी अखेर कोरोनावर मात केली.
या साऱ्या आजोबांचे कौतुक करण्यासाठी भोर उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार शिवाजी शिंदे, गटविकास अधिकारी विशाल शिंदे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास देवकर, वेल्हेचे सहायक पोलीस निरीक्षक मनोज पवार, जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे यांनी भेट देऊन परिस्थिती पाहणी केली.