पिंपरी : एलआयसी कार्यालयातून रक्कम घेण्यासाठी आलेल्या कॅश व्हॅनच्या कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राचे वार करून भरदिवसा चोरट्यांनी ४८ लाखांची रोकड असलेली पैशांची पिशवी पळविली . ही घटना गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास निगडीतील यमुनानगरमध्ये घडली. या व्हॅनमध्ये एलआयसी कार्यालयाच्या २२ लाख रकमेसह इतर बँकाची रक्कम मिळून अंदाजे ४८ लाखांची रोख रक्कम अज्ञात हल्लेखोरांनी पळविली. हल्लेखोरांनी शस्त्राचे वार करून व्हॅनचालक तसेच अन्य एकास जखमी केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅश व्हॅन घेऊन जात असताना हल्लेखोरांनी केलेल्या हल्यात महेश पाटणे (रा. हडपसर) हे जखमी झाले. त्यांच्याबरोबर भाऊसाहेब टकले (वय ३८, रा. म्हातोबानगर, कोथरुड) हे व्हॅन चालकासोबत गाडीमध्ये होते. त्यांनाही हल्ल्यात दुखापत झाली आहे. यमुनानगर येथील एलआयसी कार्यालयातून रोख रक्कम घेऊन जाण्यासाठी (एमएच ०२ एक्स ए ४६९९) ही व्हॅन घेऊन दोन जण आले. कार्यालयातून घेतलेली रक्कमेची पिशवी व्हॅनमध्ये ठेवत असताना अज्ञात चार जणांनी चालकावर वार केले. चालकाला जखमी करून रोकड असलेली बॅग हिसकावली. त्याचवेळी चालकाबरोबर असलेल्या भाऊसाहेब टकले यांनाही हल्लेखोरांनी मारहाण केली. रोख रक्कमेची पिशवी घेवून हल्लेखोर पसार झाले. यमुनानगर येथील एलआयसी कार्यालयाची २२ लाख व इतर बँकाची रक्कम अशी मिळून अंदाजे ४८ लाखांची रोकड त्यांनी पळविली आहे. हल्लेखोर दोन दुचाकीवरून पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. निगडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
भरदिवसा एलआयसी कार्यालयाची कॅशव्हॅन लुटत ४८ लाखांची रोकड पळविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 4:46 PM
कॅशव्हॅनच्या कर्मचाऱ्यांवर धारदार शस्त्राचे वार करून भरदिवसा चोरट्यांनी ४८ लाखांची रोकड असलेली पैशांची पिशवी पळविली .
ठळक मुद्देएलआयसी कार्यालयाची २२ लाख व इतर बँकाची रक्कम अशी मिळून अंदाजे ४८ लाखांची रोकड