लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लोणी कंद परिसरात रात्री येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडवून त्यांना लुटण्याच्या तयारीत असलेल्या सराईत ५ गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने जेरबंद केले.
राजन गोपाल नायर (वय ३१), राहुल गोटीराम साळुंखे (वय ३३, दोघे रा. उत्तमनगर), आकाश तायप्पा कानडे (वय २१, रा. वडारवस्ती, येरवडा), अक्षय मधुकर कोळके (वय २७, रा. रायकरमळा, धायरी), सूरज दिलीप जाधव (वय २८, रा. तांबोळी मशीदजवळ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून लोखंडी कोयता, चाकू, मिरची पूड, नायलॉनची दोरी, मोबाईल व मोपेड व इतर साधने असा ७८ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. या सर्वांवर यापूर्वी जबरी चोरी, शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत.
याप्रकरणी पोलीस अंमलदार ऋषिकेश व्यवहारे यांनी लोणी कंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट ६ चे पथक मंगळवारी रात्री गस्त घालत होते. या वेळी पिंपरी सांडस गावाजवळील विनायक डेव्हलपर्स या बांधकाम प्रकल्पाच्या जवळ काही जण जमले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांना घेरून पकडले. त्यांच्याकडील घातक शस्त्रे जप्त केली. अधिक चौकशी केली असता रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या वाहनचालकांना अडवून त्यांना लुटण्याचा त्यांनी कट रचला होता. त्यासाठी ते तेथे जमले असल्याचे आरोपींनी सांगितले. पोलीस निरीक्षक गणेश माने अधिक तपास करीत आहेत.