लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मंगळवार पेठेतील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने अटक केली.
निखिल दत्ता थोरात (वय २४, रा.वाघोली), रवी ज्ञानेश्वर बोत्रे (वय २४, रा. कोथरुड), किरण ज्ञानेश्वर बोत्रे (वय २२), अविनाश राजेंद्र कांबळे (वय २२) आणि राहुल म्हसू शिंदे (वय २४, रा.लोणी, ता.परांडा, जि.उस्मानाबाद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून २ कोयते, ५ मोबाइल, २ दुचाकी असा माल जप्त केला आहे.
या आरोपींविरुद्ध चतु:श्रृंगी १, चंदननगर २, भारती विद्यापीठ २, कोथरुड ४, उत्तमनगर, हिंजवडी, परांडा येथे प्रत्येकी १ घरफोडी, जबरी चोरी, चोरी, दुखापत असे गुन्हे दाखल आहे. निखिल थोरात व किरण बोत्रे हे हिजंवडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात २०१९ पासून फरारी असल्याचे तपासात निष्पन्न आहे.
गुन्हे शाखेचे युनिट १ चे पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अजय थोरात यांना दरोडा टाकण्यासाठी काही जण एकत्र आल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलीस पथक मंगळवार पेठेतील प्लॅटिनम बिल्डिंग येथे पोहोचले. तेथे उभ्या असलेल्या वॉटर टँकरच्या बाजूला थांबलेल्या पाच जणांना पोलिसांनी पकडले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यावर त्यांनी फरासखाना २, लोणीकंद २ आणि हिजंवडी येथील १ अशा ५ ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून ४ एलसीडी टीव्ही, ४ लॅपटॉप, २ इस्त्री, बूट व रोकड असा ४ लाख ८२ हजार रुपयांचा माल जप्त केला. न्यायालयाने त्यांना अधिक तपासासाठी २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड अधिक तपास करीत आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, पोलीस अंमलदार अजय थोरात, अमोल पवार, इम्रान शेख, आय्याज दड्डीकर, शशिकांत दरेकर, प्रशांत गायकवाड, तुषत्तर माळवदकर, महेश बामगुडे, सतीश भालेकर, अशोक माने, योगेश जगताप, सचिन जाधव, दत्ता सोनावणे यांनी ही कामगिरी केली.