लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रधानमंत्री किसान योजनेतील पुणे जिल्ह्यातील १३ हजार ६२६ बोगस लाभार्थ्यांकडून त्याच्या बँक खात्यात जमा केलेली तब्बल १४ कोटी ६ लाख रुपये वसुल करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. पुणे जिल्ह्याने वसुलीत चांगली आघाडी घेतली आहे. आतापर्यंत केवळ ५ कोटी ७८ लाख रुपये वसूल झाले आहेत.
केंद्र शासनाने गरीब व सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली होती. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्ये या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर केंद्र शासनाने सर्वच राज्यांतील बोगस लाभार्थी शोधण्याचे आदेश दिले. देशातील अल्प भूधारक शेतकरी व पाच एकर व त्यापेक्षा कमी जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दर वर्षी ६ हजार रुपये जमा केले जातात. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत या योजनेअंतर्गत ५ लाख ३१ हजार शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंद केली आहे. तब्बल १३ हजार ६२६ शेतकरी सरकारी नोकर, टॅक्स भरणारे मोठे व्यावसायिक, अनेक मयत व्यक्तींचा देखील समावेश झाला असल्याचे समोर आले आहे. या अपात्र लोकांच्या बँक खात्यात आतापर्यंत तब्बल १४ कोटी ६ लाख रूपये जमा केले आहे. या सर्व पैशांची पुन्हा वसुली करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तलाठी व संबंधित कर्मचाऱ्यांना तपासणीचे आदेश दिले आहेत. या सर्व बोगस लाभार्थ्यांकडून त्याच्या बँक खात्यात जमा केलेले पैसे पुन्हा वसूल करण्याची प्रक्रिया गेल्या सहा महिन्यांपासून सुरू आहे. आतापर्यंत १४ कोटी ६ लाखांपैकी ५ कोटी ७८ लाख रुपयेच वसूल झाले आहेत.