५ कोटी आम्हाला पुरतच नाहीत, पंतप्रधानांनी निधी वाढवून द्यावा; सुप्रिया सुळेंची थेट मोदींनाच विनंती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 16:08 IST2025-04-10T16:07:25+5:302025-04-10T16:08:10+5:30
खासदारांचे मतदार संघ प्रचंड मोठे झालेत, लोकसंख्या वाढायला लागल्यात, त्याच्यामुळे आमचा खासदार निधी पण वाढवा

५ कोटी आम्हाला पुरतच नाहीत, पंतप्रधानांनी निधी वाढवून द्यावा; सुप्रिया सुळेंची थेट मोदींनाच विनंती
पुणे: पुण्यातील भोर तालुक्यातील श्री क्षेत्र बनेश्वर (नसरापूर) येथील बनेश्वर फाटा ते वनविभाग कमान या पवित्र देवस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपोषण केले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या 2 मे ला कामाला सुरुवात करण्याच्या कबुलीवर सुप्रिया सुळे यांनी उपोषण सोडलं. त्यानंतर अजित पवारांनी सुप्रिया सुळेंच हे उपोषण स्टंटबाजी असल्याचे अप्रत्यक्षरीत्या म्हणत टीका केली. हा केवळ ६०० मीटर च्या रस्त्याचा होता. आमदार आणि खासदार यांना पाच कोटींचा निधी मिळतो. रस्ता करायचा म्हटले तर या निधीतून करता येतो. एका मिनिटात रास्ता करण्यासंबंधी निर्णय घेऊ शकतात, असे अजित पवार म्हणाले. त्याला सुप्रिया सुळेंनी प्रत्यत्तर दिले आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या, मी विनम्रपणे सांगू इच्छिते की, या देशातल्या सगळ्याच खासदारांची ही मागणी आहे. जी आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांकडे केली आहे. आमचा मतदारसंघ तेवीस लाख लोकांचा आहे. माझ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथली मी खासदार म्हणून आपली सगळ्यांची सेवा करायची आपण मला संधी दिली. नऊ तालुके तेवीस लाख मतदार आणि पाचच कोटी रुपये त्याच्यामुळे हे कशालाच पुरत नाही. म्हणजे शाळांना पैसे दिले, रस्त्यांना दिलेत.
खासदारांचे मतदार संघ प्रचंड मोठे झालेत. लोकसंख्या वाढायला लागल्यात. त्याच्यामुळे आमचा खासदार निधी पण वाढवा. पाच कोटी रुपये तुम्ही विचार करा एक नगरसेवक एक ब्रिज बांधतो का? पाच कोटी रुपयाचा. तो पाच कोटी आम्हाला पुरतच नाही. तुम्ही बारामती लोकसभा मतदार संघाचा हिशोब बघा. तेवीस लाख मतदार नऊ तालुके म्हणजे लोणावळ्याच्या नंतर आंबी गावापासून इंदापूरच्या शेवटच्या गावापर्यंत, एका बाजूला. इथे सातारा इथे नगर एवढ्या मोठ्या मतदार संघात पाच लाख रुपये देतात. एवढी महागाई झाली असे समजतात. आम्हाला गडकरी साहेबांचे रस्त्यांसाठी सहकार्य असल्याने त्रास होत नाही. गडकरी साहेब सगळं करतात. हा रस्ता जिल्हा परिषदचा होता. त्याच्यामुळे या पाच कोटी रुपयामध्ये कुठल्याच खासदाराकडे काही निधी राहताच नाही.