शिरूर : येथील वरिष्ठ मुलींच्या बालगृहात आज २८ पैकी पाच मुली परतल्या. दोन दिवसांत इतर मुलीही येतील, असे बालगृहातील सूत्रांनी सांगितले. निधी, पाणी व वीजअभावी मुलींना आणले नाही. तसेच आता हे बालगृह अनाथ मुलींसाठी असणार आहे, असे विसंगत वक्तव्य करणाऱ्या या बालगृहातील कर्मचाऱ्यांच्या विधानाला दिवस उलटला नाही तोच ‘लोकमत’च्या बातमीमुळे मुलींना आश्रय मिळू लागल्याचे चित्र आहे. बालगृहातील २८ मुली उन्हाळ्याच्या सुटीत घरी गेल्या. काही पुणे येथे गेल्या. सुटी संपली, १४ जूनला शाळा सुरू झाली. मात्र, तरीही मुली बालगृहात परतल्या नसल्याचे निदर्शनास आल्यावर बालगृहातील काळजीवाहक व लिपिकास याबाबत विचारणा केली असता, त्यांनी विसंगत उत्तर दिले होते. यामुळे मुलींच्या भवितव्याविषयी प्रश्न निर्माण झाला होता. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले. यावर माहिती घेतली असता, पाच मुली बालगृहात परतल्याचे सांगण्यात आले. निवासी अधीक्षिका एस. व्ही. भोरकर या रजेवर असल्याने निकम यांच्याकडे पदभार आहे. बालगृहाचा लॅन्डलाईन दूरध्वनी बंद आहे. तर, निकम यांनी यशस्विनी सामाजिक अभियानाच्या सचिव नम्रता गवारी यांना भ्रमणध्वनी क्रमांक देण्यास नकार दिला. मात्र, ५ मुली परतल्याचे सांगितले. (वार्ताहर)
बालगृहात ५ मुली परतल्या
By admin | Published: July 06, 2016 3:11 AM