लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मांजरीतील सिरम इन्स्टिट्युटच्या प्रकल्पातील इमारतीच्या चौथ्या व पाचव्या मजल्यावर गुरुवारी (दि. २१) दुपारी २ वाजून ३३ मिनिटांनी लागलेल्या आगीत ५ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
या इमारतीत इलेक्ट्रिक आणि पाईपिंगचे काम चालू होते. या वेळी सुरू असलेल्या वेल्डिंगच्या ठिणग्या उडून आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या आगीत इमारतीमधील दोन मजल्यांवरील सर्व साहित्य जळून खाक झाल्याचे दिसून येत आहे. अडीच वाजता लागलेली आग सुमारे साडेपाच वाजता विझविण्यात अग्निशमन दलाला यश आले. संपूर्ण जगासाठी महत्त्वाच्या असलेल्या कोरोनावरील लस उत्पादनाला आगीपासून कोणताही धोका पोहोचला नाही.
त्यानंतर दोन्ही मजल्यांवर जाऊन पाहणी केली असता होरपळलेल्या पाच व्यक्ती आढळल्या. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आग लागलेल्या दोन्ही मजल्यांवर आणखी तपासणी सुरू आहे.
मांजरी गावाजवळच्या एसईझेडमध्ये सिरम इन्स्टिट्युटचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील इमारतीमध्ये यंत्रसामग्री व इतर साहित्य बसविण्यात येत होते. या ठिकाणी येत्या ३ महिन्यांत उत्पादन सुरू करण्याचे नियोजन होते. या इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर बीसीजी लशीचे उत्पादन घेण्यात येणार होते. दुपारी अडीचच्या सुमारास येथील चौथ्या मजल्यावर आग लागली. त्याबरोबर आग-आग असा आरडाओरडा कामगारांनी सुरू केला. काही कामगार इमारतीतून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. काही जणांनी तिसऱ्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर उड्या मारून जीव वाचविला.
अग्निशमन दलाला दुपारी २ वाजून ३३ मिनिटांनी सिरम इन्स्टिट्युटमध्ये आग लागल्याची खबर मिळाली. त्याबरोबर अग्निशमन दलाच्या १० गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना झाल्या. अग्निशमन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळावर धाव घेतली.
आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणावर धूर येत होता. धुराचे लोट दूर अंतरावरून दिसत होते. आगीचे स्वरूप लक्षात घेऊन अग्निशमन दलाकडील उंचावर पाण्याचा मारा करून शकणाऱ्या हॅड्रोलिक गाड्या आणण्यात आल्या. त्याच्या साहाय्याने पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, धुरामुळे जवानांना आत प्रवेश करणे अशक्य होत होते. जवानांनी इमारतीच्या खिडक्यांची काचेची तावदाने फोडली. धूर बाहेर जाण्यास सुरुवात झाल्यानंतर फोमचा वापर करीत पाण्याचा मारा केला. १२ गाड्या, ६ खासगी वॉटर टँकरसह हॅड्रोलिक गाड्यांमार्फत सुमारे २ तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यास अग्निशमन दलाला यश आले. सायंकाळी उशिरापर्यंत अग्निशमन दलाकडून ‘कुलिंग’चे प्रयत्न चालू होते.
चौकट
घटनास्थळावर ३ स्फोट
आग लागली असतानाच दुपारी ३ वाजता पहिला स्फोट झाला. दुसरा स्फोट ३ वाजून २५ मिनिटांनी झाला. पाठोपाठ तिसरा स्फोट झाल्याचा आवाज आला. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, या इमारतीत कोणतेही उत्पादन सुरू नव्हते. पुढील ३ महिन्यांत उत्पादन सुरू करण्याच्या दृष्टीने येथे काम सुरू होते. आग प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात येणार आहे.
चौकट
कोरोना लस उत्पादन सुरक्षित
सिरम इन्स्टिट्युटमध्ये कोरोनावरील कोविशिल्ड लसीचे उत्पादन जोरात सुरू आहे. देशात आणि देशाबाहेर दररोज लक्षावधी लशी येथून जात आहेत. त्यामुळे ‘सिरम’मधील आगीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. केंद्रीय गृहमंत्रालय, तसेच मुख्यमंत्री कार्यालयाकडूनही तातडीने या घटनेची नोंद घेऊन चौकशी करण्यात आली. मात्र, कोरोना लस उत्पादनाला आगीची कोणतीही झळ पोहोचली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.