नितीश गोवंडे, लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : शहरात चोरांनी उच्छाद मांडला असून, दररोज शहराच्या विविध भाागांमध्ये चोरटे लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरून नेत आहेत. शुक्रवारी (दि. १९) शहरातील खडक, चंदननगर, लोणीकंद आणि कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल ४ घरफोडीच्या घटनांमध्ये ५ लाख ३१ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याप्रकरणी चोरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एका घटनेत मुलानेच बापाच्या घरात घुसून चोरी केल्याची फिर्याद देखील नोंदवण्यात आली आहे.
पहिल्या घटनेत, कोंढव्यातील रहिवासी मिरताज अहमद निसार नबी बागली (८०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १३ जुलै ते १६ जुलै या दरम्यान त्यांचा मुलगा उमेर मिरताज बागली (४०, रा. भवानी पेठ) आणि तबस्सुम उमेर बागली (३२) या पती-पत्नीने मिरताज यांच्या घराचे कुलूप तोडले. त्यानंतर घरातील रोख रक्कम आणि दागिने असा ३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. याबाबत मिरताज यांनी विचारणा केली असता आरोपींनी त्यांना धक्के देत घराबाहेर काढले तसेच खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पवार करत आहेत.
दुसऱ्या घटनेत, वडगावशेरी येथील रहिवासी लक्ष्मी सुभाष ढेकणे (६७, रा. धनलक्ष्मी सोसायटी, सोमनाथनगर) या १० जुलै ते १९ जुलै दरम्यान त्यांच्या सुनेकडे राहण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी चोरांनी त्यांच्या बंद घरात प्रवेश करून कपाटातील १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा १ लाख १५ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस कर्मचारी नाणेकर करत आहेत.
तिसऱ्या घटनेत, वाघोली येथील रहिवासी प्रकाश रुपाराम चौधरी (२५) यांचे लोहगाव-वाघोली रोडवर मेडिकल आहे. १९ जुलैच्या मध्यरात्रीनंतर पहाटेपर्यंतच्या वेळेत दोन चोरांनी त्यांच्या मेडिकलचे शटर उचकटून गल्ल्यातील ४ हजार ५० रुपये चोरले. यावेळी चोर त्यांच्या दुचाकीवरून (एमएच १२ क्युएच ०७२६) वरून आले होते. अमित कुमार अबदेश (२१) आणि गणेश शर्मा (१९) अशी आरोपींची असून यातील अमित कुमार याला पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कोळपे करत आहे.
तर चौथ्या घटनेत, कोंढव्यातील रहिवासी मनिष चंपक संघवी (५०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १८ जुलै ते १९ जुलै दरम्यान अज्ञात चोरांनी त्यांच्या लुल्लानगर येथील कंपनीच्या ऑफिसचे कुलूप तोडून टेबलच्या ड्रॉव्हरमधील ५ मोबाईल, १ चांदीची मुर्ती, दोन चांदीचे दीवे, डीव्हीआर आणि इंटरनेट डिस्ट्रिब्युटर असा ६२ हजाराचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.