पुण्यात येरवडा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत जाहीर; अजित पवारांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 03:38 PM2022-02-04T15:38:02+5:302022-02-04T15:38:17+5:30
पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक आहे
पुणे : पुण्यातील येरवड्यामधील शास्त्रीनगर परिसरात वाडिया बंगल्याजवळ इमारत स्लॅबची जाळी कोसळून पाच कामगारांना प्राण गमवावे लागणे, हे दुर्दैवी, क्लेशदायक असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मृत्युमुखी पडलेल्या पाच कामगारांना श्रद्धांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्र्यांनी मृत कामगारांच्या कुटुंबियांबद्दल सहसंवेदनाही व्यक्त केल्या असून मृतांच्या कुटूंबियांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या दुर्घटनेची माहिती घेतली असून अन्य जखमी कामगारांवर उपचार सुरळीत सुरु राहतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. इमारतीचा स्लॅब कोसळून दुर्घटना घडण्याच्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी, या घटनेमागची कारणे शोधून त्रुटी दूर केल्या जातील, दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असेही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले असून त्याबाबत प्रशासनाला सक्त सूचना दिल्या आहेत.
सर्व मजूर बिहार येथील कटियार या एकाच गावातले
गुरुवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास बांधकाम साइटवर लोखंडी जाळी बसविण्याचे काम सुरू होते. या ठिकाणी दहा ते पंधरा मजूर काम करत होते. अचानक काम सुरू असताना लोखंडी जाळी खाली काम करणाऱ्या मजुरांच्या अंगावर कोसळली. दहा जण अडकले होते. या दुर्घटनेनंतर सुमारे दोन तास सुरू असलेल्या मदत कार्यानंतर दुर्घटनेत अडकलेल्या मृत व गंभीर जखमी मजुरांना बाहेर काढण्यात आले. यामधील तीन जखमींवर ससून रुग्णालयात तर दोन जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे सर्व मजूर बिहार येथील कटियार या गावातील असून मागील काही दिवसांपासून वाडीया बंगला येथील बांधकाम साइटवर मजुरीचे काम करत होते.