पुणे : सायबर चोरटे हे नियमिम नवनवीन युक्त्या काढून लोकांना फसवत असल्याचे दिसून येते. एका पद्धतीची लोकांना माहिती झाली व लोक सावध होऊ लागले की, आणखी नव्या प्रकारे ते लोकांना गंडा घालत असतात. आता त्यांनी लोकांना फसविण्यासाठी सध्या एसएमएसचा आधार घेतला आहे. बँकेकडून मेसेज आल्याचे भासवून लोकांना विश्वास संपादन करुन त्याद्वारे ते फसवणूक करु लागले आहेत. कोंढव्यातील एका ज्येष्ठ नागरिकाला बँक खाते ब्लॉक केल्याचा टेक्स मेसेज पाठवून लिंक पाठवून पॅनकार्ड टाईप करायला लावून तब्बल ५ लाखांना गंडा घातला आहे.
याप्रकरणी उंड्री येथील एका ५७ वर्षाच्या गृहस्थाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या मोबाइल फोनवर एसबीआयचे अकाऊंट ब्लॉक केल्याचा टेक्स मेसेज पाठविला. त्यांना एक लिंक शेअर करुन त्यावर लॉगिन करुन नेट बॅकिंग अपडेट करुन तुमचा पॅन नंबर टाकण्यास सांगितले. त्यानुसार या नागरिकाने दिलेल्या लिंकवर जाऊन पॅनकार्ड क्रमांक टाईप केला. त्यानंतर त्यांच्या बँक खात्यावरुन ५ लाख ४ हजार ३४२ रुपये ट्रान्सफर करुन सायबर चोरट्यांनी फसवणूक केली. पोलीस निरीक्षक राऊत अधिक तपास करीत आहेत.