पुणे (भिगवण) : आपल्या अवतीभवती दागिने, मोबाईल, दुचाकी, चारचाकी यांसारख्या अनेक चोरीच्या घटना घडलेल्या पाहायला मिळतात.आणि कोरोना महामारीच्या काळात तर चोरीच्या घटनांमध्ये विलक्षण वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. अशीच एक चोरीची आश्चर्यकारक घटना पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात घडली आहे. यात चक्क ५ लाखांचे मासेच चोरीला गेल्याची तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात दिली आहे.
इंदापूर तालुक्यातील पोंधवडी येथील रहिवाशी असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेततळ्यातील मासेच चोरीला गेल्याची ही घटना घडला आहे. बापूराव पवार असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी पाच लाखांचे मासे चोरीला गेल्याची तक्रार भिगवण पोलीस ठाण्यात दिली. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखक केला आहे.
मासे चोरीला गेल्याची घटना इंदापूर तालुक्यातील पोंधवडी गावात उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. तक्रारदार शेतकऱ्याने स्वतःच्या मालकीच्या शेततळ्यातून मासे चोरीला गेले असल्याची माहिती दिली आहे. तसेच या चोरीला गेलेल्या माशांची किंमत पाच लाखांहुन अधिक आहे असा दावा केला आहे.
शेतकरी बापूराव पवार पवार म्हणाले, महिन्यांपूर्वी सायफरनिस प्रजातीचे ५ हजार आणि ७ हजार चिलापी जातीच्या माशांचे बीज १५ महिन्यांपूर्वी शेततळ्यात सोडले होते. मात्र, ७ जुलै रोजी शेततळ्यातून मासे चोरीला गेल्याचे लक्षात आले. आम्ही शेतात तळे तयार केले असून त्याद्वारे आम्ही मासे पालनाचा व्यवसाय सुरु केला आहे. आणि शेततळ्यातील सायफरनिस व चिलापी प्रजातींचा माशांची चांगली काळजी घेतल्यामुळे त्यांचं वजन देखील वाढले होते. जवळपास ३०० ते ५०० ग्रॅमपर्यंत वाढ झाली होती. याचमुळे आम्ही माशांच्या विक्रीसाठी व्यापाऱ्यांसोबत व्यवहारही केला होता. पण जेव्हा आम्ही शेततळ्याच्या ठिकाणी मासे पकडायला गेलो तिथे आम्हाला आश्चर्याचा धक्काच बसला.कारण शेततळ्यातून मासेच चोरीला गेले होते.