धनकवडी (पुणे) : खडकवासलाविधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. एकूण ५०७ मतदान केंद्रांवर मतदान होणार असून २८०० अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.
खडकवासलाविधानसभा मतदार संघाचे निवडणूक कार्यालय आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड टेक्निकल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये करण्यात आले आहे. येथील पत्रकार परिषदेला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व तहसीलदार किरण सुरवसे, गटविकास अधिकारी भूषण जोशी, मतदार संघाचे विविध कक्षांचे नोडल अधिकारी बैठकीस उपस्थीत होते.
उमेदवारी अर्ज विक्री, भरणे, माघारी घेणे, छाणनी, मतदानाच्या ईव्हीएम मशीन देणे आणि घेणे. अशी निवडणुकीची सर्व प्रक्रिया सिंहगड टेक्निकल कॉलेजच्या कॅम्पसमध्ये होणार आहे. परंतु मतमोजणी २३ नोव्हेंबर रोजी तारखेला कोरेगाव पार्क येथील गोदामात होणार आहे.
'खडकवासला' विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या ५,६९,२२२ असून लोकसभा निवडणुकीपेक्षा विधानसभा निवडणुकीत मतदारांची संख्या ३११९१ ने वाढली आहे. या मतदारसंघात मतदारांची एकूण संख्या आता ५ लाख ६९ हजार २२२ इतकी झाली आहे. यात ३ लाख ३७० पुरुष, तर २ लाख ६८ हजार ८११ महिलांचा समावेश आहे. तर ४१ तृतीयपंथी मतदार आहेत.
संवेदनशील केंद्र नाही
खडकवासला विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ५०७ मतदान केंद्र आहेत. यातील एकही केंद्र संवेदनशील नाही. शहर व ग्रामीण पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. आदर्श आचारसंहितेचे पालन करण्यासाठी देखरेख नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकाऱ्यांच्या नावांचे फलक झाकण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. एकूण ५०७ मतदान केंद्र आहेत. त्यातील ५०५ केंद्र नियमित व दोन सहाय्यक आहेत. एका मतदान केंद्रांत दीड हजार मतदार असून त्यापेक्षा अधिक मतदार असलेल्या ठिकाणी दोन सहाय्यक मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत.
मतदान केंद्रांवरील कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग २६ व २७ ऑक्टोबर रोजी सिंहगड कॅम्पस येथे आयोजित केले आहे. शहरी भागातील सोसायटीत नवीन आठ मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मतदान केंद्रांची संख्या १९ झाली आहे. भारत निवडणूक आयोगाचा सूचने नुसार सर्व मतदान केंद्र ही तळमजल्यावर असली पाहिजे, त्यामुळे अनेक ठिकाणी पाऊस पडेल याची दक्षता घेऊन मंडप उभारून मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे.