- किरण शिंदे
पुणे : पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार असल्याचे सांगून टेंडर मिळवून देण्याचं आमिष दाखवत एका व्यक्तीची तब्बल ५० लाख रुपयांनी फसवणूक करण्यात आली. हा संपूर्ण प्रकार घडलाय पुण्यातील कौन्सिल हॉल परिसरात. शासनाचे टेंडर मिळवून देण्याचं आमिष दाखवून आरोपींनी फसवणूक केली. याप्रकरणी एका महिलेसह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काश्मीरा संदीप पवार (वय २९, रा. प्लॉट नंबर १४, कोयना सोसायटी, सदर बाजार सातारा) आणि गणेश गायकवाड (रा. सातारा) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर गोरख जगन्नाथ मरळ (वय ४९, रा. पुणे) त्यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात याप्रकरणी भादवि ४१९, ४२०, ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपींची कुठल्यातरी कारणावरून ओळख झाली होती. यानंतर आरोपी कश्मीरा पवार यांनी फिर्यादी यांना त्या स्वतः पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रीय सल्लागार म्हणून कार्यरत असल्याचे सांगितले. शासकीय टेंडर मिळवून देतो अशी बतावणी सुद्धा कश्मीराने केली. विश्वास संपादित व्हावा म्हणून आरोपींनी फिर्यादी यांना थेट पुण्यातील विधान भवनात भेटण्यासाठी बोलावलं व त्यांच्या व्हाट्सअप वर शासकीय टेंडरचे बनावट कागदपत्र सुद्धा पाठवले
टेंडर मिळवल्यानंतर पैसे कमवता येतील या भावनेतून फिर्यादी यांना विश्वास बसला. टेंडर मिळवायचे असेल तर पैसे भरावे लागतील असे सांगून आरोपींनी वेळोवेळी फिर्यादी यांच्याकडून रोख स्वरूपात तसेच आरटीजीएस द्वारे ५० लाख रुपये उकळले. एवढी मोठी रक्कम देऊन सुद्धा टेंडर मिळत नाही आणि आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात येताच फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार दिली. त्यानंतर बंडगार्डन पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक गावडे अधिक तपास करत आहेत.