पुणे: राज्यातील विणकर समाजाची लोकसंख्या ५० लाखांपेक्षाही जास्त आहे. पारंपरिक काम करणाऱ्या या समाजाकडे सरकारने पूर्ण दुर्लक्ष केले असून यापुढेही असेच होत राहिल्यास समाज शांत बसणार नाही असा इशारा पद्मशाली महिला मंडळाच्या वतीने देण्यात आला. सरकारने देखल घेतली नाही तर संपूर्ण समाज राज्यव्यापी आंदोलन करेल असा इशाराही या मंडळाने दिला.
पद्मशाली महिला मंडळ समाजात मागील सलग काही वर्षे काम करते आहे. पारंपरिक विणकाम करणारा हा समाज आता त्यांच्या उद्योग जवळपास बंदच झाल्यामुळे दुसऱ्या गृहउद्योगांमध्ये गुंतला आहे. सरकारने कल्याणकारी राज्य या संकल्पनेत समाजाला मदत करण्याची गरज आहे. मात्र सरकार काहीही करायला तयार नाही. अन्य समाजांसाठी वेगवेगळे उपाय अमलात आणले जात असताना विणकर समाजाकडे असे दुर्लक्ष केले जेणे खेदजनक तर आहेच शिवाय संताप आणणारे आहे असे मत महिला मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले.
मंडळाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. अध्यक्षा शुभांगी अंदे, मेघा चिंतल, रेखा आडेप, पद्मा मार्गम, नीलिमा वडेपेल्ली, मनीषा नल्ला व अन्य महिला पदाधिकारी यावेळी उपस्थित होत्या. निवेदनात विणकारांचे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, एसबीसी साठी स्वतंत्र २ टक्के आरक्षण मिळावे, ओबीसी आरक्षणास धक्का न लावता आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, जातीनिहाय जनगणना तत्काळ सुरू करावी, कंत्राटी नोकर भरतीचे सरकारी धोरण रद्द करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. संघटना २० जिल्ह्यांमध्ये काम करते. सर्व ठिकाणी महिला कार्यरत आहेत. या मागण्यांची दखल घ्यावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.