लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वाढते शहरीकरण लक्षात घेऊन राज्य शासनाने पुणे शहरात नवीन ५ पोलीस ठाणी निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात याबाबत बैठक होणार आहे. या बैठकीत त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी लोणी काळभोर आणि लोणी कंद ही पोलीस ठाणी पुणे शहर पोलीस दलात समाविष्ट करण्याचा आदेश ऑक्टोबर महिन्यात काढण्यात आला होता. मात्र, त्याला ग्रामीण भागातील आमदारांनी विरोध केल्याने ही प्रक्रिया थांबली होती.
आता लोणी कंद आणि लोणी काळभोर पोलीस ठाण्यातून विभाजन करून वाघोली व उरुळी कांचन ही दोन नवी पोलीस ठाणी निर्माण करण्यात येणार आहेत. हवेली पोलीस ठाण्यातून नांदेड सिटी, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यातून बाणेर, हडपसर पोलीस ठाण्यातून काळेपडळ आणि चंदननगर पोलीस ठाण्यातून खराडी पोलीस ठाणी नव्याने निर्माण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावावर या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे. या बैठकीसाठी पोलीस महासंचालकासह वरिष्ठ अधिकारी आणि पुणे शहर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, ग्रामीण पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, तसेच आमदार चेतन तुपे, सुनील टिंगरे, अशोक पवार यांना निमंत्रित करण्यात आले आहे.
या पोलीस ठाण्यांची निर्मिती येत्या २६ जानेवारीच्या मुहूर्तावर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
--
पुणे शहर व ग्रामीण पोलीस दलातील पोलीस ठाण्याच्या विभाजनाबाबत प्रस्ताव गृह विभागाकडे पाठविण्यात आले असून त्यावर सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीत त्याबाबतचे निर्णय होणार आहे. नवीन पोलीस ठाण्यांची निर्मिती लवकरात लवकर करण्यात येणार आहे.
- अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे