लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध पुणे पोलिसांनी मोहिम उघडली असून वेगवेगळ्या कारवाईमध्ये पोलिसांनी ५ जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून ६ इंजेक्शन जप्त केली आहेत.
गुन्हे शाखेच्या युनिट-१ चे पोलीस अंमलदार दत्ता सोनवणे व प्रशांत गायकवाड यांनी डेक्कन जिमखाना येथील कर्वे रोडवरील सह्याद्री हॉस्पिटलसमोर ७० हजार रुपयांची रेमडेसिविर इंजेक्शन विकण्यासाठी दोघे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक भरत जाधव यांनी त्यांची खात्री करुन कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
राहुल सुनील खाडे (वय २२, रा. लोहगाव) आणि विजयराज दिनकर पाटील (वय ३१, रा. वडगाव शेरी) यांच्या ताब्यातून ३ रेमडेसिविर इंजेक्शन ताब्यात घेतले.
रेमडेसिविर इंजेक्शन बाळगणाऱ्या विष्णु रामराव गोपाळघरे (वय ३४, रा. रहाटणी, पिंपरी) याला अलंकार पोलिसांनी दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमागील डीपी रोडवर पकडले. त्याच्या ताब्यातून एक इंजेक्शन जप्त केले आहे.
खंडणी विरोधी पथकाने रेमडेसिविर इंजेक्शन विकण्याच्या प्रयत्नात असणारे शुभम नवनाथ आरवडे (वय २२, रा. चिंचवड) आणि वैभव अंकुश मळेकर (वय २०, रा. चिखली) यांना खडकीतील किर्लोस्कर ऑईल कंपनीच्या गेटजवळ पकडले. त्यांच्या ताब्यातून २ इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.