नारायणगाव (पुणे) : नारायणगाव येथील व्हिजन गॅलेक्सी सोसायटीमधील तीन माजली स्वतंत्र इमारतीमध्ये महादेव बुक व लोटस ३६५ या बेटिंग ॲप्सचे ‘फायनान्शिअल सेंटर’वर पुणे ग्रामीण पोलिसांनी टाकलेल्या छाप्यातील कारवाई सलग दुसऱ्या दिवशीही सुरू होती. पोलिसांनी ९९ जणांवर गुन्हा दाखल केला असून, यातील तीन जण अल्पवयीन मुलांचा समावेश आहे, तर तीनजण फरार आहेत. पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने जुन्नर न्यायालयात पाच आरोपींना हजर केले असता त्यांना २० मेपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली, तर उर्वरित ८८ जणांचा दृकश्राव्य माध्यमातून (व्हिडीओ कॉन्फरन्स ) ओळख परेड घेऊन त्यांना न्यायालयीन कोठडी दिली. या सर्वांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.
कुणाल सुनील भट (वय २८, रा. पेठ, जळगाव, महाराष्ट्र), समीर युनूस पठाण (वय २५ रा शुक्रवार पेठ, जुन्नर, जि. पुणे), रशीद कमाल शरीफ फुल्ला (वय २८ रा वजिराबाद, दिल्ली), अजमाद खान सरदार खान (वय ३३, रा. दुर्गागंज, लखनऊ, उत्तर प्रदेश), यश राजेंद्रसिंग चौहान (वय २७, रा. नेवसरगोला, गोरखपूर, उत्तर प्रदेश) या पाचजणांना चार दिवस पोलिस कोठडी मिळाली आहे.
या छाप्यात पोलिसांनी ४४ संगणक डेस्कटॉप आणि लॅपटॉप, १८८ सेलफोन आणि इतर साहित्य जप्त केले. "गेल्या दोन महिन्यांपासून या सेंटरमध्ये क्रिकेट लीग सट्टा, विविध सांघिक खेळ आणि ऑनलाइन गेमवर सट्टा स्वीकारले जात होते. या बेटिंगचे दोन प्रमुख हृतिक कोठारी (२४) आणि राज बोकरिया (२५) हे व्यावसायिक व अन्य एक असे तीनजण सध्या फरार आहेत. अटक करण्यात आलेले बहुतेक ऑपरेटर हे उत्तर प्रदेश, बिहार आणि राजस्थानचे आहेत, तर काहीजण नारायणगाव आणि जुन्नर येथील आहेत, या लोकांना गेल्या दोन महिन्यांत ऑनलाइन जाहिराती आणि मुलाखतीद्वारे भरती करण्यात आले होते.
९६ लोक हे कॉल सेंटरद्वारे ४००पेक्षा जास्त बँक खाती हाताळत होते, सर्व खाती पैसे स्वीकारणे आणि इतरांना पैसे अदा करण्यासाठी बँक सुविधेचा वापर होत असे, पोलिसांनी ४०० बँक खाते किट जप्त केलेल्या आहेत. याबाबतचा तपास पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व नारायणगाव पोलिस हे करीत आहेत. आरोपींच्या बाजूने ॲड. राजेंद्र कोल्हे, ॲड. केतन कावळे यांनी काम पहिले. फरार आरोपीचा शोध जलदगतीने सुरू आहे.